ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कौटुंबिक वादातून महिलेने लोकलखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संजना अजित शेरे असे तिचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तासभर अगोदर तिने तिच्या नातेवाईकांना मोबाईलवर मेसेज पाठवले होते. घडल्या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो पुढील तपासासाठी विक्रोळी पोलिसांकडे सोपवला आहे.
संजना ही पती सोबत विक्रोळी येथे राहत होती. दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. विवाहानंतर तिला मूल होत नव्हते. मूल होण्यासाठी तिने डॉक्टरकडे उपचारही केले होते. तर संजना आणि अजितचे किरकोळ कारणारून वाद होत असायचे. आत्महत्येच्या चार दिवस अगोदर अजित आणि संजनाचा वाद झाला होता. संजनाच्या मोबाईलमध्ये एक ग्रुप फोटो होता. त्यावरून अजितने संशय घेऊन तिला मारहाण केली होती. मारहाणीनंतर तिने विक्रोळी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. विक्रोळी पोलिसांनी संजनाची समजूत काढून काही दिवस माहेरी राहण्यास सांगितले. त्यानंतर संजना माहेरी राहू लागली.
शुक्रवारी सकाळी संजना ही कामावर जाते सांगून घराबाहेर पडली. तिने विक्रोळी रेल्वे स्थानक गाठले. आत्महत्येच्या तास भर अगोदर तिने वडिलांना आणि भावाला मेसेज पाठवले. त्यानंतर ती काही वेळ रेल्वे स्थानकात थांबली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकलसमोर तिने उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती समजताच कुर्ला रेल्वे पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांना घटनास्थळी मोबाईल आणि पर्स सापडली. त्यावरून पोलिसांनी संजनाची ओळख पटवली. कुर्ला रेल्वे पोलिसांनी एडीआर नोंदवून तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी संजनाच्या वडिलांचा जबाब नोंदवून घेतला. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संजनाच्या सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल केला.






