मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) – महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा कोरोनाच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देवून शिष्यवृत्ती परिक्षा तूर्त पुढे ढकलण्यात येत आहे. परिक्षेची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी कळविले आहे.

या निर्णयामुळे परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता ८ वी ही दि. २३ मे रोजी होणार नसून, सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणाऱ्या या परिक्षेची तारीख सर्व विद्यार्थ्यांना प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात येणार आहे.






