गोपीनाथ मुंडे यांच्याइतका छळ कोणत्याही नेत्याचा झाला नाही – ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे टीकास्त्र

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – कोरोना संसर्गामुळे सर्वत्र आणीबाणी उद्‌भवली आहे. यावेळेस कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी कोरोनाच्या लढ्याबाबत मांडलेल्या भूमिकेचे स्वागत केले. मी गडकरींच्या मताशी सहमत असल्याचेही त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांच्याइतका छळ महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचा झाला नाही, असे विधानही नाथाभाऊंनी यावेळी करत भाजपावर टीकास्त्र सोडले.

एकनाथराव खडसे यांनी सोमवारी दुपारी जळगावात आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्यावर वृत्तपत्र प्रतिनिधींशी बोलत होते. एकनाथराव खडसे पुढे म्हणाले, कोरोनाच्या लढ्याबाबत भाजप नेते नितीन गडकरी यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. हीच भूमिका महिनाभरापूर्वी मी देखील मांडली होती. कोरोनाचे संकट दूर करायचे असेल तर सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यायला हवे. आम्ही विरोधक आहोत की सत्ताधारी हे विसरून कोरोना कसा दूर करता येईल, यासाठी विधायक सूचना देणे, प्रत्यक्ष कृतीद्वारे काम करणे गरजेचे आहे. यंत्रणेवर दररोज टीका करणे, त्रुटी काढणे असे प्रकार केल्यामुळे यंत्रणा नाउमेद होते. त्यामुळे असे प्रकार टाळायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

भाजप नेत्यांची ओबीसी नेत्यांबाबत असलेल्या भूमिकेवर मत मांडताना नाथाभाऊ म्हणाले, भाजपने नेहमी ओबीसी नेत्यांना न्याय देण्याचे काम केले आहे पण अलीकडे चित्र बदलले आहे. भाजपच्या काही नेत्यांकडून ओबीसी नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. गोपीनाथ मुंडे यांचा अशाच पद्धतीने छळ झाला. त्यांचा जेवढा छळ झाला तेवढा महाराष्ट्रातील अन्य कोणत्या नेत्याचा झाला नाही. माझ्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात मी विधानसभेत भूमिका मांडली. परंतु, काही एक उपयोग झाला नाही. माझ्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे, अण्णा डांगे, भाऊसाहेब फुंडकर या नेत्यांचाही छळ झाला. आता तर चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळ यांना धमकी देणे हे तर भलतंच झालं. यावरून माझ्यामागे ईडी लावण्याचे षडयंत्र यांचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

वर्षानुवर्षे अनेक सरकारे आली आणि गेली पण यापूर्वी असे ईडी, सीबीआय यंत्रणेकडून विरोधकांना त्रास देण्याचे प्रकार कुणी केले नाहीत. पूर्वी या यंत्रणा तर जनतेला माहिती पण नव्हत्या. ईडी, सीबीआय तसेच एनआयए यासारख्या यंत्रणांद्वारे त्रास देणे चुकीचे असल्याचे मत नाथाभाऊंनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here