कोरोना नियम उल्लंघन प्रकरणी माजी खासदार पप्पू यादव अटकेत

papu-yadav

पाटणा (बिहार) – जन अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार पप्पू यादव यांना अटक करण्यात आलीय. पप्पू यादव यांना लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.आपल्याला अटक करून पाटण्याच्या गांधी मैदान पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर ट्विट करून पप्पू यादव यांनी दिली.

उल्लेखनीय म्हणजे, भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांनी खासदार निधीतून खरेदीत केलेल्या अॅम्ब्युलन्सची पोलखोल करत पप्पू यादव यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. खासदार निधीतून खरेदी करण्यात आलेल्या डझनभर अॅम्ब्युलन्स धूळ खात पडल्या आहेत. त्या जनतेच्या वापरासाठी का आणल्या जात नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावर भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांनी ड्रायव्हर नसल्यानं अॅम्ब्युलन्सचं संचालन होत नसल्याचं कारण पुढे केलं होतं. याच्या दुसऱ्याच दिवशी पप्पू यादव यांनी एक पत्रकार परिषद घेत ४० चालकांना हजर करत हे लोक अॅम्ब्युलन्स चालवण्यास तयार असल्याचं सांगत राजीव प्रताप रुडी यांच्या दाव्यांची पोलखोल केली होती.

त्यानंतर अमनौरमध्ये पप्पू यादव यांच्याविरोधात लॉकडाऊन नियमांच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विश्वप्रभा सामुदायिक केंद्रात आपल्या ताफ्यासह दाखल होत पप्पू यादव यांनी लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यापूर्वी शनिवारी पप्पू यादव यांच्यावर अॅम्ब्युलन्स तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here