‘आयजीएम’मध्ये कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ऑक्सिजन हायफ्लो मशिनची आग आटोक्यात

इचलकरंजी (प्रतिनिधी) – येथील इंदिरा गांधी रुग्णालयामधील (आयजीएम)आयसीयू विभागात ऑक्सिजनपुरवठा करणाऱ्या हायफ्लो मशिनला काल मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून वीज खंडित करून आग आटोक्यात आणली. रुग्णांना तातडीने अन्यत्र हलविल्यायामुळे कोणालाही धोका पोहोचला नाही.

‘आयजीएम’ रुग्णालयातील आयसीयूमधील काल दुपारी 12 वाजेच्या सुमारास ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या हायफ्लो मशिनला आग लागली. ही घटना लक्षात येताच, या ठिकाणच्या वॉर्डबॉय, सुरक्षारक्षक, तसेच डॉक्टर्स या सर्वांनी तत्काळ हालचाली केल्या. प्रसंगावधान राखून अग्निशमन उपकरणाचा वापर करून आग रोखण्यात आली. वीजपुरवठा बंद करून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यात रुग्णांचीही पुरेपूर काळजी घेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील आयसीयूमध्ये लागलेली आग प्रसंगावधान राखून वेळीच आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र शेटे, तसेच वॉर्डबॉय, सुरक्षारक्षक, डॉक्टर्स अशा सर्वांचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या परिस्थितीबाबत माहिती घेत, त्यांची काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खरगे यांनी रुग्णालय प्रशासन, तसेच विविध यंत्रणांकडून माहिती घेतली व याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here