काल चंद्रदर्शन न झाल्याने शुक्रवारी साजरी होणार रमजान ईद

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – बुधवारी चंद्रदर्शन होईल असे वाटत असताना ते न झाल्याने आता मुस्लिम बांधवांची रमजान ईद शुक्रवारी साजरी होणार आहे. त्यामुळे गुरुवारी या महिन्याचा तिसावा उपवास होणार असून त्यानंतर शुक्रवारी (१४ मे) रमजान ईद साजरी होणार आहे. रमजान महिन्याचे चंद्रदर्शन बुधवारी होण्याची शक्यता गृहीत धरून हिलाल सीरत कमिटीने चंद्रदर्शन पाहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील विविध ठिकाणी चंद्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रमजान महिन्याचे चंद्रदर्शन बुधवारी सायंकाळनंतर कोठेही होऊ शकले नाही.

यासंदर्भात हिलाल सीरत कमिटीच्या सदस्यांच्या झालेल्या बैठकीत बुधवारी रात्री गुरुवारी रमजान महिन्याचा शेवटचा उपवास (तिसावा) करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (१४मे ) रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे, असा निर्णय हिलाल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.

दरम्यान, रमजान ईद साजरी करण्याबाबत राज्य शासनाने नियमावली जारी केली आहे. त्याद्वारे मुस्लिम बांधवांनी ईद साजरी करण्यासाठी एकत्र न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, तर सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या बरोबरच, नमाज पढण्यासाठी मशिदीत किंवा मोकळ्या जागेत देखील एकत्र येऊ नये, अशीही सूचना शासनातर्फे देण्यात आली आहे. रमजान ईदेच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले आहे. या वेळेचे तंतोतंत पालन करण्यात यावे आणि त्या वेळेव्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये, अशीही सूचना करण्यात आली आहे.

या बरोबरच या निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नियमावलीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here