मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबई: चकमकफेम पोलीस अधिकारी दया नायक यांची प्रशासकीय कारणांखाली मुंबई एटीएस मधून थेट गोंदिया येथे बदली करण्याचा आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी ६ मे रोजी काढला होता. मात्र, त्याला दया नायक यांनी अर्जाद्वारे तातडीने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांच्यासमोर आव्हान दिल्यानंतर ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए. पी. कुऱ्हेकर यांनी आज महासंचालकांच्या आदेशाला स्थगिती दिली.
दया नायक यांनी अॅड. मकरंद लोणकर यांच्यामार्फत अर्ज दाखल करून बदली आदेशाला आव्हान दिले आहे. ‘पूर्वी माझी बदली मुंबईतून नागपूर विभागात करण्यात आली होती. त्यावेळी मला व माझ्या कुटुंबीयांना अंडरवर्ल्डमधील गुंड व दहशतवाद्यांकडून धोका असल्याची भीती व्यक्त केल्यानंतर राज्य सरकारने राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालाच्या आधारे बदली आदेश रद्द केला होता. पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर सप्टेंबर-२०१९पासून मी एटीएस मध्ये कार्यरत आहे. माझ्या सेवेविषयी कोणतीही तक्रार नसताना ६ मे २०२१ रोजी अचानक माझी बदली मुंबईतून गोंदियामध्ये करण्याचा आदेश काढण्यात आला. त्यासाठी प्रशासकीय कारण देण्यात आले. मात्र, माझा सेवेचा सर्वसाधारण काळ पूर्ण झाला नसताना, नियमित बदलीसाठी माझे नाव अपेक्षित नसताना आणि मला व माझ्या कुटुंबीयाला धोका असतानाही मुंबईतून नागपूर विभागात बदलीचा आदेश काढण्यात आला आहे’, असे म्हणणे नायक यांनी अर्जात मांडले होते.
दया नायक यांच्या अर्जावर राज्य सरकारची बाजू मुख्य सरकारी वकील स्वाती मणचेकर यांनी मांडली तर नायक यांच्यावतीने अॅड. मकरंद लोणकर यांनी युक्तिवाद केला. न्या. कुऱ्हेकर यांनी अॅड. लोणकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत बदली आदेशाला स्थगिती दिली. नायक यांच्यासाठी हा दिलासा आहे.






