बुलढाणा (प्रतिनिधी) – ‘कोरोनामध्ये मंदिरे बंद आहेत. देव पण लॉक करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कुणीच येणार नाही. स्वतःलाच स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणून हे उपास-तापास बंद करा. रोज ४ अंडी खा. एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटिनयुक्त पदार्थ भरपूर खा’, असा सल्ला बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंदू समाजबांधवांना दिला असून या सल्ल्यामुळे गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गायकवाड यांच्या या विधानाचा थेट त्यांना फोन करूनच वारकरी प्रतिनिधींनी निषेध केला आहे. या संभाषणाची क्लिप सध्या व्हायरल होत आहे.
कोरोनाच्या नावाखाली हिंदू सनातन धर्मीयांना मांसाहाराकडे वळवण्याचा आमदार संजय गायकवाड यांचा प्रयत्न असून संजय गायकवाड यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला मुलाखत देऊन त्यात बेताल वक्तव्ये केली आहेत व निराधार दावे केलेत, असा आरोप वारकऱ्यांनी केला आहे. उपास-तापास करू नका, मांसाहार करा. करोना काळामध्ये मंदिरांचे दरवाजे बंद केले आहेत. देवही तुमच्या मदतीला येणार नाही, अशी विधाने गायकवाड यांनी केल्याने व ही बातमी सर्वत्र व्हायरल झाल्याने वारकऱ्यांच्या आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असेही वारकऱ्यांचे म्हणणे आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावर विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी फोनवरून आक्षेप नोंदवला. या चर्चेतही गायकवाड आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. मुस्लिम समाजामध्ये मांसाहाराचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणून मुस्लिम समाजात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे आणि हिंदू धर्मीयांमध्ये मांसाहाराचे प्रमाण कमी आहे म्हणून हिंदूंमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे, या वक्तव्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करायला हवी, असे सांगितले असता त्यांनी त्यास नकार दिला, असे शेटे यांनी सांगितले. मला कुणाच्या भावनांशी घेणे देणे नाही. मला लोकांचे प्राण वाचवायचे आहेत. तुम्हाला कोणाला मानायचे असेल तर माना पण मी कोणाला मानत नाही, असे गायकवाड म्हणाल्याचेही शेटे यांनी सांगितले.






