नाशिक (विशेष प्रतिनिधी) – येथील महापालिकेच्या बिटको कोरोना बाधित रुग्णालयात शनिवारी (दि.१५) भाजपच्या नगरसेविका सीमा ताजने यांचे पती कन्नू ताजने यांनी चारचाकी वाहनासह काचेचे प्रवेश दार फोडून आतमध्ये प्रवेश केला. पेवर ब्लॉक स्टाफच्या दिशेने फेकून शिवीगाळ केली. काही जणांना किरकोळ मारहाण देखील केली. यानंतर पुन्हा चारचाकी वाहनासह ते बाहेर निघून गेले. त्यांच्या या कृतीमुळे बिटको रुग्णालयातील कर्मचारी आणि स्टाफमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. रात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांसोबत संपर्क साधला असता त्यांनी अद्याप फिर्यादी नसल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. येथील डॉ. सोनवणे आणि डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी याबाबत माध्यमांना माहिती देतांना सर्व सविस्त माहिती देताना विनाकारण काहीएक कारण नसताना हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे सांगितले.
दरम्यान, कनू ताजने यांनी चारचाकी वाहन बिटको रुग्णालयाच्या आतमध्ये का नेले? याबाबत उलट सुलट चर्चा आहे. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना वेळेत उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे ते दगावले. त्याचा संताप आल्याने ताजने यांनी हे कृत्य केल्याची चर्चा केली जाते आहे.






