पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – करोनाशी लढा सुरु असताना आता खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भोरगिरी, भिवेगाव परिसरात नागरिकांच्या घरांना शनिवारी (दि. 15) तौक्ते वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. यात घर, शाळा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या जोरदार वादळात भिवेगाव येथील नव्याने बांधलेल्या शाळेचे आणि भोरगिरी येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्र्याचे शेड उडून गेले. तर भोरगिरी येथील ग्रामपंचायत इमारतीचे छत उडाले आहे.भोरगिरी येथील एका ग्रामस्थाचे संपूर्ण घर पडल्याने 100 टक्के तर दोन्ही गावातील 87 घरांचे नुकसान झाले आहे. त्यात 15 घरांचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. इतर घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे.
एकीकडे करोनाचे संकट असल्याने घर खर्चाला पदरमोड नाही तर दुसरीकडे आता वादळाने घराचे नुकसान झाल्याने घरे दुरुस्त कशी करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वेळी आलेल्या निसर्ग वादळातही येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.सार्वजानिक मालमत्तेचे नुकसान झाले होते तर विजेचे खांब पडल्याने अनेक दिवस ही गावे अंधारात होती. करोनाच्या संकट काळातच अस्मानी वादळाचे संकट आल्याने आदिवासी भागातील नागरिक भयभीत झाला आहे.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरांचे नुकसान झाल्याने दुरुस्ती कशी करायची हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. वादळात नुकसान झालेल्या नागरिकांना तात्काळ शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी भोरगिरी, भिवेगाव गावातील नागरिक करीत आहेत. अजूनही वादळाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन शासनाने केले आहे.






