रत्नागिरी (प्रतिनिधी) – चौपदरीकरणातील अंडरपाससाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात आंबेवाहू बोलेरो कार कोसळून झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. महामार्गावरील लोटेमाळ येथे पहाटे 5:20 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात चालक आणि क्लिनरचे केवळ दैव बलवत्तर म्हणून ते दोघेही केवळ जखमी होण्यावर बचावले. महामार्ग चौपदरकरीणाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप परिसरातील नागिरकांनी केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. खेड तालुक्याच्या हद्दीतून जाणाऱ्या 44 किलोमीटर रस्त्याचे काम कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी करत आहे. सध्या लोटेमाळ येथे चौपदरीकरणाच्या कामाने गती घेतली असून या ठिकाणी अंडरपाससाठी खड्डा खोदण्यात आला आला आहे. ज्या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला आहे त्या ठिकाणी कंत्राटदार कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना न केल्याने या ठिकाणी अपघात होऊ शकतो, अशी शक्यता परिसरातील नागरिकांनी वर्तवली होती मात्र कंत्राटदाराने याकडे दुर्लक्ष केले.
आज सकाळी रत्नागिरीहन मुंबईकडे आंबे घेऊन जाणाऱ्या बोलेरो चालकाला अंडरपाससाठी खोदण्यात आलेल्या या खड्ड्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगातील बोलेरो कार खड्ड्यात कोसळली. या अपघातात चालक अक्षय अनंत चव्हाण रा. डेरवण आणि क्लिनर उद्देश तारपी हे सुदैवाने केवळ किरकोळ जखमी होण्यापासून बचावले. या अपघातात बोलेरो कार आणि त्यामध्ये असलेले आंबे असा सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अपघाताच्या वेळी झालेला आवाज ऐकून आजुबाजुच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे काळोख असल्याने आणि गाडी खड्ड्यात असल्याने नेमके काय झाले ते कळत नव्हते, मात्र गाडीचे हेडलाईट्स सुरू असल्याने मदतीसाठी गेलेल्या नागरिकांना कोणतेतरी वाहन खड्ड्यात पडले असल्याचे लक्षात आले. तात्काळ मदतकार्य करुन नागरिकांनी गाडीत अडकून पडलेल्या दोघांना बाहेर काढले तसेच चालकाकडून मिळालेल्या माहितीवरून गाडीमालक अक्षय भाटकर यांना मोबाईलवरून अपघाताची माहिती दिली. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. हा अपघात कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याने या कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.






