मुंबई (प्रतिनिधी) – कोरोनाने सध्या संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला असून वाढती कोरोना रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच देशात मृत्यू दरही झपाट्याने वाढत असल्याचे भयावह चित्र पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांसह राजकारणी, अभिनेते, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, दिग्गज व्यक्तीही धोरणामुळे मृत्त पावल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू राजेंद्रसिंह जडेजा यांचं कोरोनाने निधन झालं आहे.
राजेंद्रसिंह जडेजा यांच्या जाण्याने भारतीय क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं जडेजा यांच्या निधनाची माहिती दिली. बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह यांनी जडेजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
राजेंद्रसिंह जडेजा हे उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी 50 फर्स्ट क्लास आणि 11 लिस्ट A मॅचमध्ये अनुक्रमे 134 आणि 14 विकेट्स घेतल्या. या दोन्ही प्रकारात त्यांनी अनुक्रमे 1536 आणि 104 रन देखील काढले आहेत. त्याचबरोबर जडेजा यांनी 53 फर्स्ट क्लास, 18 लिस्ट A आणि 34 टी20 मॅचमध्ये रेफ्री म्हणून देखील काम केलं आहे. ते सौराष्ट्र क्रिकेट टीमचे कोच, मॅनेजर आणि निवड समितीचे सदस्य देखील होते. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शहा यांनीही जडेजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान, राजेंद्रसिंह जडेजा यांचं निधन ही क्रिकेट विश्वाची मोठी हानी आहे. मी आजवर ज्या व्यक्तींना भेटलोय त्यापैकी ते एक जबरदस्त व्यक्ती होते. ते कोच, मॅनेजर आणि निवड समितीचे सदस्य असताना क्रिकेट खेळण्याचं भाग्य मला लाभलं, अशा शब्दात जयदेव शहा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.






