मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – ताशी 120 किमी वेगाने वाहणारे वादळी व प्रचंड घोंघावणाऱ्या वाऱ्याने संपूर्ण डोलणारी झाडे, टप्प्या-टप्प्यावर उन्मळून पडणारी झाडे-फांद्या यामुळे आज मुंबईसह राज्यभरात ‘तौकते’ चक्रीवादळाने अक्षरशः थरकाप उडवला. ‘सतर्कतेचा’ इशारा असूनही रविवारी दिवसभर चकवा दिलेल्या वादळाने मध्यरात्रीपासूनच मुंबईतही आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली.
हवामानात अचानक झालेल्या या बदलामुळे मुंबई किनाऱ्यावर दोन जहाजे भरकटल्याने 410 जणांचा जीव धोक्यात आला आहे. रेल्वे मार्गावर झाड पडल्याने मध्य व हार्बर रेल्वे ठप्प झाली. शिवाय मोनो-मेट्रोही बंद पडली. सिंधुदुर्गला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. ‘तौकते’ने राज्यात 11 जणांचा बळी घेतला असून सर्वाधिक बळी ठाणे, रायगडातील आहेत. रात्री वादळ गुजरातमध्ये धडकल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
तौकते चक्रीकादळामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली. पंतप्रधानांनी गुजरात तसेच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला. वादळामुळे झालेले नुकसान तसेच मदतकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.
मुंबईत काल 114 किमी ताशी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे भलीमोठी उत्तुंग झाडेही मुळापासून शेंडय़ापर्यंत अक्षरशः धोकादायकरीत्या डोलत होती. सोसाटय़ाच्या वाऱ्याने अनेक घरांच्या पत्र्यांचा होणारा प्रचंड आवाज रहिवाशांच्या काळजात धडकी भरवणारा होता. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे शहरात 156 ठिकाणी, पूर्व उपनगरात 78 तर पश्चिम उपनगरात 245 अशा 479 ठिकाणी झाडे, झाडाच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. तर शहरात 6, पूर्व उपनगरात 2, पश्चिम उपनगरात शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. घर आणि घराच्या भिंती पडण्याच्या घटना – शहरात 15, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम उपनगरात 8 अशा एकूण 26 घटना घडल्या.






