‘द फॅमिली मॅन’ वेब सीरीजचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – अ‍ॅमेझॉन प्राइमवरील ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरीजला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मनोज वाजपेयी यांनी साकारलेली मुख्य भुमिका चर्चेचा विषय ठरली होती.

अगदी पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासून चाहते या वेब सीरीजच्या दुसऱ्या भागाची वाट पाहात होते. मध्यतंरी या वेब सीरीजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. पण सैफ अली खानच्या ‘तांडव’ या वेब सीरीजमुळे देशात बराच वादंग उठला होता. याच पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी ‘द फॅमिली मॅन-2’ च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती.

मागील दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या या वेब सीरीजचा दुसरा भाग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी या वेब सीरीजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून 4 जूनला हा सीझन पाहायला मिळणार आहे. ‘द फॅमिली मॅन’ च्या पहिल्या सीझनमध्ये मुख्य भूमिकेत असणाऱ्या श्रीकांत तिवारी अर्थात मनोज वायपेयीनं अनेकांची मनं जिंकली होती. अनेकांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं.

या थ्रिलर सिरीजच्‍या 9 भागांच्‍या नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन आणि जागतिक दर्जाचा गुप्‍तचर अशी दुहेरी भूमिका साकारणार आहे. यावेळीही मनोज वायपेयी देशावर होणारा घातक हल्ला परतवून लावताना दिसणार आहे. रोमांचक ट्विस्‍ट्स आणि अनपेक्षित क्‍लायमॅक्‍सनं परिपूर्ण असणाऱ्या या अ‍ॅक्शन-ड्रामा सिरीजचा आगामी सीझन श्रीकांतची दुहेरी भूमिका लक्षवेधक ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here