तौक्ते पाठोपाठ दुसरे यास चक्रीवादळ धडकणार

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – तौक्ते चक्रीवादळाचा कहर संपत नाही तोच भारतीय हवामान खात्याने आणखी एका मोठ्या चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. येत्या 23 मे रोजी हे यास चक्रीवादळ पूर्वेकडील बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमानही वाढले आहे.

तौक्ते चक्रीवादळाने पश्चिम किनारपट्टीवरील गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यत या वादळामुळे 66 जणांचा मृत्यू झाला असून अरबी समुद्रात ओएनजीसीच्या कामगारांची बोट उलटून मोठी दुर्घटना देखील घडली आहे. यामध्ये 14 जणांचे मृतदेह नौदलाला सापडले आहेत. तर 184 जणांना वाचविण्यात यश आले आहे. तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्रातील किनारी भागातील जिल्ह्यांचे मोठे नुकसान केले आहे. घरांवरील छपरे उडून गेली आहेत. जागोजागी झाडे कोसळली आहेत. तसेच अनेक भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून वीजही खंडित झालेली आहे. असे असताना चार-पाच दिवसांच्या फरकाने आणखी एक मोठे चक्रीवादळ देशावर घोंघावू लागले आहे.

ओमानने या चक्रीवादळाचे नाव यास असे ठेवले आहे. बंगालच्या उपसागरातील, अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा 2 अंशांनी वाढले आहे. सध्या ते 31 डिग्री सेल्सिअस आहे. असे असले तरीदेखील यास चक्रीवादळ तौक्ते एवढे ताकदवर नाहीय. हे वादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या दिशेने येत आहे, असे अर्थ सायन्सेस मिनिस्ट्रीचे सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here