अमरावती (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – कोरोनाच्या या कठीण समयी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून अहोरात्र काम करत आहेत. अमरावतीमध्ये एका 50 वर्षीय खासगी रुग्णवाहिका चालकाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. ही बाब शहरातील रुग्णवाहिका चालकांसाठी धक्कादायक ठरली. त्यामुळे शहरातील रुग्णवाहिका चालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शवविच्छेदनगृह ते हिंदू स्मशानभूमीपर्यंत सायरन वाजवीत रांगेत 17 ते 20 रुग्णवाहिका नेऊन सहकाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभाग दर्शविला व अनोखी श्रद्धांजली वाहिली. मात्र, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिका जात असल्याचे बघून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर रुग्ण वाहिका चालकाला 9 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात सारीच्या वॉर्डातील दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मात्र मृत्यू झाल्यानंतर या रुग्ण वाहिका चालकाचा कोरोना रिपोर्ट positve आला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातूनच हा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी हिंदू स्मशानभूमीत नेण्यात आला.
आपला सहकारी गेल्याचे दुख: अन्य खासगी रुग्णवाहिका चालकांना झाले. रुग्णवाहिका चालक संघटनेच्या वतीने अनोखी श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सायरनचा जोरदार आवाज करीत रुग्णवाहिका रेल्वे स्थानक चौक, राजकमल चौक, गांधी चौक, भुतेश्वर चौक येथून हिंदू स्मशानभूमीकडे निघाल्या. या सर्व रुग्णवाहिका अमरावती येथील हिंदू स्मशानभूमीत एकत्र आल्यात व तेथेच त्यांनी आपल्या या साथीदाराला श्रद्धांजली अर्पण केली. एकाचवेळी सुमारे 17ते 20 रूग्णवाहिका हिंदू स्मशानच्या दिशेने जात असल्याचे बघून कोरोनाबाधित मृत्यूचा स्फोट तर झाला नाही, अशी भीती नागरिकांना झाली होती.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. मात्र, रुग्णवाहिका चालकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन सायरन वाजवीत हिंदू स्मशानभूमीपर्यंत नेल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना सायरन वाजवायला मनाई आहे. त्याअनुषंगाने रुग्णवाहिका चालकांचे नाव निष्पन्न करून गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी सांगितलं.






