मोदी सरकारचं मोठं पाऊल, भारतीयांचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी एक चॅनल सुरू करणार

नवी दिल्ली – माध्यम स्वातंत्र्यांच्या बाबतीत भारत जगात 142व्या क्रमांकावर आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीदरम्यान भारतात असंख्य न्युज चॅनल्स उभी राहिली. त्यानंतर त्यातील काही चॅनल नंतर बंद देखील झाली. असं असतानाच आता मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी एक चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारे दूरदर्शन आता एक नवीन चॅनेल सुरु करणार आहे. ‘डीडी इंटरनॅशनल’ असं या नव्या चॅनेलचं नाव आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका आणि देशातील अंतर्गत प्रकरणे मांडण्यासाठी हे चॅनल स्थापन करण्याचा निर्णय मोदी सरकार घेणार आहे. भारताचा आवाज जागतिक पातळीवर मांडण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून या चॅनेलची निर्मिती केली जाणार आहे, असं सांगण्यात येत आहे.

बीबीसी वर्ल्ड प्रमाणे हे चॅनल काम करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या भारतात डीडी इंडिया हे चॅनल आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका मांडण्याचं काम करत आहे. हे इंग्रजी माध्यमातलं चॅनल आहे. डीडी इंडियाचं नाव बदलूून डीडी वर्ल्ड ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू पुन्हा त्याचं नाव डीडी इंडिया ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता या नव्या चॅनलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिका मांडण्यात येणार आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून या विषयी काम करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. ईओआयच्या कागदपत्रातून ही माहिती समोर आल्याचं सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here