मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्यात सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचेजे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिलपासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळीअंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही मुदत आता आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला दिनांक १४ जून २०२१ पर्यंत योजनेअंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिनांक १४ मे २०२१ रोजी यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चेन’ प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली आहे.
शिवभोजन थाळी १४ जून २०२१ पर्यंत मोफत!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 21, 2021
दरम्यान, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत, याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे. राज्यात गेल्या १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन योजनेअंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे.




