पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – हडपसर परिसरातील मंत्री मार्केटजवळ सार्वजनिक ठिकाणी अवैध मटका जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने काल (दि. २० मे) छापा टाकला आहे. या कारवाईत आठ जणांवर महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून १,६८,१९०/- रु.ची रोकड जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथील मंत्री मार्केटजवळ मोकळ्या मैदानात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मटका जुगार खेळत असल्याची माहिती मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाल्याने त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून करण्याचे कारवाईचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांना दिले.
त्यानुसार, गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरीविरोधी पथक-१ च्या मदतीने वरील ठिकाणी जाऊन छापा टाकला. त्यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये मटका जुगार खेळणारे व खेळविणारे असे एकूण ८ जण त्या ठिकाणी मिळून आले. त्यांच्याकडील १,६८,१९०/- रु. रोख रक्कम व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे १ चे सहा. पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, (अति कार्य) सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, गुन्हे शाखेचे सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके यांच्या पथकाने तसेच गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरीविरोधी पथक १ यांनी केली आहे.






