औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – जालना शहरातील एका महिला लाभार्थीला दोन वेगवेगळ्या लसीचे डोस देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईचा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिला आहे.
राज्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यानं दिलासा मिळाला असला तरी मृतांचं प्रमाण मात्र चिंताजनक आहे. अशा स्थितीत लवकरात-लवकर आणि जास्तीत-जास्त लोकांच लसीकरण करणं गरजेचं आहे. मात्र, अनेक ठिकाणी लस उपलब्ध नसून लसीकरण केंद्रावर अशाप्रकारे सावळा-गोंधळ दिसून येत आहे.
रंजना अशोक निक्कम (वय 49) असं या महिलेचं नाव असून त्यांनी 16 मार्च रोजी जालना शहरातील आस्था हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सींन लसीचा पहिला डोस घेतला होता. लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं दुसरा डोस घेण्यासाठी त्यांना जवळपास 50 दिवस प्रतीक्षा कारवाई लागली. दरम्यान, 6 मे रोजी रंजना निक्कम यांनी जालना शहरातील शांतिनिकेतन विद्या मंदिर या शाळेत लसीचा दुसरा डोस घेतला. मात्र, हा डोस घेताना नेमका गोंधळ उडाला. श्रीमती निक्कम यांनी पहिला डोस कोव्हॅक्सीन लसीचा घेतला असताना दुसरा डोस मात्र त्यांना कोव्हिशील्डचा देण्यात आला.






