पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – हडपसरमध्ये दहशत पसरविणाऱ्या टोळीतील फरार असलेला टोळीप्रमुख आरोपी शुभम कामठे याला लोणीकाळभोर पोलिसांनी पिस्तुलासह जेरबंद केले आहे. ही कारवाई आज (दि. २३ मे) पहाटे हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथे करण्यात आली आहे. शुभम कैलास कामठे (वय-२६ वर्षे, रा. कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, पुणे) याच्यावर लोणीकाळभोर व हडपसर पोलीस स्टेशन येथे खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल आहेत.
शुभम कैलास कामठे हा त्याच्या टोळीचा टोळीप्रमुख होता. त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून रोहन इंगळे नावाच्या व्यक्तीला १७ फेब्रुवारी रोजी कोयत्याने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच परिसरात दहशत निर्माण केली होती. याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. शुभम कामठे हा गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक अमित साळुंखे व पोलीस कॉन्स्टेबल निखील पवार यांना दि. २३ मे रोजी वरील आरोपी शुभम कामठे हा पहाटे सोरतापवाडी या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सोरतापवाडी या ठिकाणी सापळा रचला. मिळालेल्या माहितीप्रमाणे शुभम कामठे हा सोरतापवाडी येथील गोल्डन ड्रिम्स लॉजसमोर आला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून पळून जाऊ लागला; परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व दोन काडतुसे जप्त केली आहेत. याबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ-५ च्या पोलीस उप आयुक्त नम्रता पाटील, हडपस विभागाचे स.पो.आ.कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि राजू महानोर, सपोनि दादाराजे पवार, पोसई अमित गोरे यांच्या सोबत पोलीस हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, पोलीस नाईक अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, पोलीस कॉन्स्टेबल राजेश दराडे, दिगंबर साळुंके, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, रोहिदास पारखे यांनी केली आहे.






