मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वांद्रे परिसरातील चिंचवडी भागात सापाळा रचून एका ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका 75 वर्षीय वृद्ध महिलेला अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी तिच्या झोपडीतून तब्बल 3 किलो 960 ग्रॅम वजनाचं चरस जप्त केलं आहे. याची बाजारातील किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये इतकी आहे. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने केली असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास केला जात आहे.
संबंधित अटक केलेल्या 75 वर्षीय वृद्ध महिलेचं नाव जोहराबीन अकबर अली शेख असं असून ती आपल्या झोपडी शेजारी राहणाऱ्या 57 वर्षीय किशोर गवळी याच्या मदतीनं ड्रग्ज रॅकेट चालवत होती. या ड्रग्ज रॅकेटची माहिती मिळाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने वांद्रे पश्चिमेकडील चिंचवडी भागात सापळा रचून किशोर गवळी याला अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडे 7 तोळे चरस आढळला आहे.
याप्रकरणी आरोपी किशोर गवळी याची चौकशी करत असताना, तो हा माल चिंचवडी भागात घराशेजारी राहणाऱ्या वृद्ध महिलेकडून घेत असल्याचं सांगितलं. यानुसार गुन्हे शाखा युनिट 7 चे प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर आणि त्यांच्या पोलीस पथकानं संबंधित वृद्ध महिलेच्या घरी शनिवारी रात्री छापा टाकला. यावेळी वृद्ध महिलेच्या झोपडीत तब्बल 3 किलो 800 ग्रॅम चरस आढळला आहे. हा सर्व चरस पोलिसांनी जप्त केला असून रविवारी वृद्धेला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.






