सीबीएसई बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाइनच

नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या 12 वीच्या बोर्ड परीक्षा 15 जुलै ते 26 ऑगस्ट या कालावधीत होण्याची शक्यता आहे. परीक्षेचे अंतिम वेळापत्रक 1 जूननंतर जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी सध्या बोर्डाच्या बैठका सुरू आहेत. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची पद्धत बदलली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांपैकी काही जण बारावीच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी सोशल मीडियावर निषेध व्यक्त करत आहेत.

यंदाच्या परीक्षा नियमित प्रोटोकॉलनुसार घेण्यात येणार नाहीत. सीबीएसईने एकतर फक्त काही विषयांची परीक्षा घेण्याचे किंवा सर्व विषयांची परीक्षा तीन तासांऐवजी दीड तासांची घेण्याचे सुचवले होते. उच्च पदाधिकारी आणि राज्य शिक्षण सचिव यांच्यात काल झालेल्या बैठकीत बहुतेक राज्यांनी यातील दुसऱ्या प्रकाराला अनुमोदन दिले आहे. मात्र, काही मंत्र्यांनी या दोन्ही प्रकारांच्या मिश्रणाची मागणी केली होती. यातील दुसरा प्रकार स्वीकारल्यास परीक्षेची पद्धत बदलली जाईल. 1.5 तासांच्या परीक्षेसाठी, विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत परीक्षा पूर्ण करता यावी यासाठी केवळ बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) आणि अगदी लहान उत्तरे लिहिण्याचे प्रश्न असतील.

सुत्रांच्या माहितीनुसार केंद्राकडून राज्यांसमोर परीक्षेसंबधी दोन पर्याय ठेवण्यात आले व ही परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय झाला असून, जुलै महिन्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here