राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दारबंद चर्चा

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – पित्ताशयाचे ऑपरेशन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. या भेटीत तौक्ते वादळातील नुकसानग्रस्ताना करावयाची मदत, करोनाचं संकट, लॉकडाऊनमुळे अनेक घटकांवर आलेल्या संकटासह मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याचे समजते. मात्र, या बैठकीतील अधिकृत तपशील स्पष्ट न झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पित्ताशयाचे ऑपरेशन झाल्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आज संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास पवारांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.ही बैठक तब्बल अर्धा तास झाली. या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे समजू शकले नाही. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मधल्या काळात विविध घटकातील लोकांनी पवारांची भेट घेतली होती. लॉकडाऊनमुळे उद्‌भवलेल्या समस्यांचे निवेदन या घटकांनी पवारांना दिले होते. त्यामुळे पवारांनी या घटकांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याचे सांगितले जात आहे. तसेच मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय तौक्ते वादळामुळे कोकणासह राज्यातील अनके भागाचं नुकसान झाले आहे.

केंद्राकडून तोकडी मदत मिळाली आहे. त्यावर आणि राज्याकडून जाहीर करावयाच्या पॅकेजवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. तसेच राज्यात करोनाचा संसर्ग कमी झाला आहे. पण म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी पवारांकडून सल्ला घेतल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here