ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्या प्रकरणात सुशील कुमारने फेटाळले सर्व आरोप

नवी दिल्ली – ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्या प्रकरणाला आता नवं वळण आले आहे. या प्रकरणात अटकेत असलेला ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमार याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

सागर धनकर हत्या प्रकरणात दोन आठवडे फरार असलेल्या सुशील कुमारला रविवारी अटक करण्यात आली. आता दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये सुशील कुमारने सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘मी निर्दोष आहे. माझी दिशाभूल करण्यात आली. मला लोकांनी लपण्याचा सल्ला दिला होता, ‘ असा दावा सुशील कुमारने केला आहे. त्याचबरोबर मी कुणाची हत्या का करु? असा प्रश्नही त्याने विचारला. त्याचबरोबर माझे कोणत्याही गँगस्टरळी संबंध नसल्याचा दावा सुशीलने केला आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुशीलच्या या दाव्यात काही तथ्य आहे का? की त्याने तपासाची दिशाभूल करण्यासाठी हा दावा केला आहे, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत.

सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 4 मे रोजी एक फ्लॅटमधून सागर आणि त्याच्या मित्रांचं अपहरण केलं. त्यानंतर छत्रसाल स्टेडियममध्ये नेऊन त्यांना बेदम मारहाण केली. सागर आणि त्याच्या दोन मित्रांना अर्धमेले होईपर्यंत मारहाण झाली, असा दावा दिल्ली पोलिसांनी दिली आहे. या घटनेच्या फुटेजवरूनही हे स्पष्ट झाले आहे. सुशील कुमारही या मारहाणीच्या दरम्यान उपस्थित होता, असे फुटेजमध्ये दिसत होते.

सुशील कुमार आणि सागर धनखड यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते असंही समोर येत आहे. या मारहाणीनंतर सुशील कुमार दोन आठवडे फरार होता. त्याच्यावर पोलिसांनी एक लाखाच्या बक्षीसाची घोषणाही केली होती. सुशील कुमारनं या प्रकरणी कोर्टात धावही घेतली. पण त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही. सुशील कुमारवर कलम 302 (हत्या), 365 (अपहरण), 120-B (गुन्हेगारी कट रचणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here