आता इंजिनिअर व्हा ते ही मराठीतून; ‘एआयसीटीई’चा कॉलेजांना हिरवा कंदील

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – इंजिनीयरिंगचे शिक्षण हे बहुतांशी इंग्रजी भाषेमध्येच आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना ही इंग्रजी अवघड वाटते. त्यामुळे इंजिनीयरिंगमध्ये त्यांचे प्रमाण कमी असते. पण आता इंजिनीयर होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) महाविद्यालयांना मराठीसह आठ प्रादेशिक भाषांमधून इंजिनीयरिंगचे पदवी शिक्षण देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मराठीतूनही इंजिनीयर होता येणार आहे.

एआयसीटीईने मराठी भाषेबरोबरच हिंदी, बंगाली, तेलगू, तमीळ, गुजराती, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्येही इंजिनीयरिंगचे पदवी शिक्षण देण्यास हिरवा कंदील दिला आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनच त्याची सुरुवात करता येणार आहे. अनेक हुशार विद्यार्थीही केवळ इंग्रजीच्या भीतीपोटी इंजिनीयरिंगपासून दूर राहतात. त्यांच्यासाठी आता मातृभाषेतून इंजिनीयरिंगचे शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान आणि चीनमध्ये संपूर्ण शिक्षण तेथील प्रादेशिक भाषेमध्येच दिले जाते. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच एआयसीटीईने प्रादेशिक भाषेतील शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिल्याचे सांगितले जाते. या धोरणानुसारच संबंधित महाविद्यालयांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. एआयसीटीईने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरच्या मदतीने इंजिनीयरिंगच्या अभ्यासक्रमाचे 22 प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर केले जाऊ शकते.

या शाखांसाठीच मातृभाषेचा पर्याय एआयसीटीईने उपलब्ध करून दिलेला हा पर्याय सध्यातरी पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी तसेच मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आदी शाखांसाठीच उपलब्ध असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here