मास्टरशेफ स्पर्धेत ‘तिने’ चक्क कांद्यापासून बनविला केक

नवी दिल्ली – मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया हा पाककला क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत लोकप्रिय असा रिअ‍ॅलिटी शो आहे. आगळे-वेगळे पदार्थ सादर करण्यासह दिलेल्या पदार्थांपासून वेगळा पदार्थ बनवणं अशी विविध आव्हानं यात असतात. जगातील अत्यंत नावाजलेले शेफ यात परीक्षक म्हणून काम करतात. अशा या शोच्या 13 व्या पर्वात सध्या भारतीय शेफ दीपिंदर छिब्बर आपल्या आगळ्या-वेगळ्या पाककृतींनी परीक्षकांसह खवय्यांचंही मन जिंकत आहे. दीपिंदरनं सादर केलेली एक जबरदस्त रेसिपी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ही डिश आहे ग्रीन करी केक विथ चॉकलेट चिली गनाश आणि नारळ आईस्क्रीम.

दिपिंदरला कांद्यापासून काहीतरी वेगळी डिश बनवण्यास सांगण्यात आलं होतं, तर तिनं चक्क त्यापासून केक बनवला. तिची ही अफलातून डिश परीक्षकांना अतिशय आवडली आहे. या आधी तिनं सादर केलेल्या छोले, पराठा आणि कढाई पनीर या स्वादिष्ट पदार्थांनी परीक्षक जॉक झोनफ्रिलो, मेलिसा लेओंग आणि अँडी अ‍ॅलन यांना चांगलंच प्रभावित केलं होतं. ही एक तगडी स्पर्धक आहे, तिला हरवणं कठीण आहे, असं परीक्षक जॉक झोनफ्रिलो यांनी म्हटलं होतं.

आता या ग्रीन करी केकनं त्यांना फारच प्रभावित केलं आहे. कांद्यापासून गोड आणि चटकदार अशी ही एकदम वेगळी डिश बनली आहे, अशी प्रतिक्रिया अँडी अॅलन यांनी दिली, तर लेओंग यांनी करी आणि केक एकत्रित आणून एक उत्तम डिश बनवल्याचं सांगितलं. झोनफ्रिलो यांनीही ही डिश एकदम आवडली असल्याची प्रतिक्रिया दिली.

दिपिंदर छिब्बरने तिच्या इन्स्टाग्रामवर या डिशचे फोटो शेअर केले आहेत. ‘कोणाला प्रश्न पडला असेल, की याची चव कशी असेल, तर याची चव एकदम वेगळी आहे, असं तिनं लिहिलं आहे. थाई करी कधी मिष्टान्नाची चव देईल, असं कधीही वाटलं नव्हतं असंही तिनं म्हटलं आहे. तिच्या पोस्टवर खवय्यांच्या भरभरून कमेंट्स येत असून, थाई करीपासून बनलेल्या या अनोख्या केकबाबत लोकांना अतिशय आश्चर्य वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here