नवी दिल्ली – दिल्लीतील यू-टय़ूबरने केलेला स्टंट त्याच्यावर चांगलाच शेकला आहे. गौरव जॉन असे या यू-टय़ूबरचे नाव आहे. त्याने आपल्या पाळीव श्वानाभोवती हेलियम फुगे बांधले आणि नंतर श्वानाला हवेत उडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्याला पोलिसी इंगा मिळाला आहे.
गौरव शर्मा असे यू-टय़ूबरचे नाव असून तो गौरव जॉन नावाने यू-टय़ूब चॅनेल चालवतो. तो सातत्याने नवनवीन व्हिडियो अपलोड करत असून त्याचे चार लाख सबक्रायबर्स आहेत. नुकतेच गौरवने श्वानाचा व्हिडियो अपलोड केला होता. त्यात असं दिसत होतं की, गौरवने ‘डॉलर’ नावाच्या त्याच्या पाळीव श्वानाभोवती हेलियमचे फुगे बांधले आणि नंतर त्याला उचलून घेतले. ‘चला आता डॉलरला उडवूया’ असं म्हणत गौरवने फुगे थोडे सैल सोडले. त्यानंतर बिच्चारा श्वान घराच्या बाल्कनीपर्यंत हवेत उडाला. यावेळी गौरवची आईदेखील उपस्थित होती.
गौरवचे हे कृत्य बघून प्राणीप्रेमी संतापले. त्यानंतर गौरवने चॅनेलवरून हा व्हिडियो हटवला. पीपल फॉर ऍनिमल सोसायटीच्या सदस्यांनी गौरवच्या कृत्यावर तीव्र आक्षेप घेत प्राण्याचा छळ केल्या प्रकरणी मालवीय नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गौरव आणि त्याच्या आईविरोधात प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.






