भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे एफसीआयच्या एका क्लर्कच्या घरात अधिकाऱ्यांनी काळं धन ठेवण्यासाठी एक गोडाऊन तयार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. CBI च्या छापेमारीत या कर्मचाऱ्याच्या घरातील लॉकरमधून 3 कोटी रुपये, 670 ग्रॅम चांदी आणि 387 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. याशिवाय जमिनीची कागदपत्रंही सापडली आहेत. एका बँक खात्यात 1 कोटी रुपये असल्याची बाब समोर आली आहे. यावेळी सीबीआयला नोट मोजण्याची मशीनही सापडली आहे.
क्लर्क किशोर मीणा याला सीबीआयच्या लाचलुचपत विभागाने एफसीआयच्या तीन अधिकाऱ्यांसह शुक्रवारी सिक्युरिटी एजन्सीकडून लाच मागणे आणि घेण्याच्या प्रकरणात अटक केली आहे. यानंतर शनिवारी सकाळपासून सीबीआयने चौघांच्या घराचा तपास करण्यास सुरुवात केली. क्लर्क किशोर मीणाच्या छोला स्थित घराच्या तपासात मिळालेली कॅश आणि सोनं पाहून अधिकारी हैराण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, तीनही अधिकारी आपली काळी कमाई या क्लर्कच्या घरात लपवित होते.
सीबीआयला तीन अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारीदरम्यान काहीच सापडलं नाही. मात्र सीबीआयला किशोर मीणाच्या घराच्या तपासात एक मोठा लॉकर आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली. लॉकरमध्ये पैसे, सोनं, चांदी होती. सीबीईयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एफसीआयचे अधिकारी लाचेची रक्कम क्लर्कच्या घरात ठेवत होते.






