पुणे (विशेष प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या माजी नगरसेवकाला पुण्यात जुगार खेळताना पुणे मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद शंकर शेट्टी असं अटक करण्यात आलेल्या नगरसेवकांच नाव असून तो मार्केट यार्ड परिसरातील विपुल बंगल्यात आपल्या इतर मित्रांसह पार्टी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी तत्काळ घटनास्थळावर धाड टाकली.
तेव्हा सर्व आरोपी दरवाज्याला बाहेरून कुलूप लावून आत जुगार खेळत असल्याचं पोलिसांना दिसलं. तेव्हा त्यांनी खिडकीमधूनच विचारपूस केली असता हर्सल पारेख नामक व्यक्तीच्या सांगण्यावरून आम्ही इथे जुगार खेळतोय आणि तो बाहेरून कुलूप लावून आमच्यासाठी जेवण आणायला गेला असल्याचं आरोपीनं सांगितलं. त्यानुसार पोलिसांना खात्री पटली आणि पंचा समक्ष कुलूप तोडून मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन सर्व आरोपीना अटक केली. या गुन्ह्यात आरोपी प्रसाद शेट्टी सोबत असलेल्या अन्य 18 आरोपींना देखील मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. आणि या सर्वांकडून 53 हजार 900 रुपये रोख रक्कम आणि एक लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केलं आहे.
दरम्यान लॉकडाऊन असतांना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात हे आरोपी कसे जमले, या ज्या बंगल्यात जुगार खेळला जात होता त्याचा मूळ मालक कोण याचा पोलीस शोध घेतायत. तर कोरोना संसर्ग काळात विनामास्क आणि कोरोना विरोधातील नियमांची पायमल्ली करून जुगार खेळणाऱ्या या सर्वां विरुद्ध संचारबंदीच उल्लंघन केल्या प्रकरणी तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल क्रम पुढील तपास सुरू असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे पिंपरी चिंचवडमधील अवैध धंदे बंद झाल्यामुळे जुगारी आणि इतर आंबट शौकीन पुण्यात जातायत अशी चर्चा रंगली आहे. मात्र अस असल्यास पुणे पोलिसांना अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे या घटनेमुळे अधोरेखित झालं आहे.






