पावसात घेतलेला आसरा बेतला जीवावर; झाड अंगावर कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

यवतमाळ (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील लोणी परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात बाभळीचे झाड अंगावर कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

महादेव शेंडे (६५, रा. लोणी ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेतातील कामे आटोपून परत येत असताना, अचानक सोसाट्याचा वारा सुटून आलेल्या वादळी पावसामुळे रस्त्यालगत एका दुकानाजवळ उभे होते. त्याचवेळी महादेव शेंडे यांच्या अंगावर लगतचे बाभळीचे झाड कोसळले. त्यात ते झाडाखाली दबले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ झाडाखालून काढत उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान महादेव शेंडे यांचा आज मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी वादळाचा मोठा तडाखा या भागाला बसला. या वादळात वीज वितरणचे ३३ केव्ही विद्युत पुरवठा करणारे १३ विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. दारव्हा मार्गावर अर्धवट बांधकाम असलेल्या पुलामुळे रस्त्यावर चिखल झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. अवकाळी आलेल्या वादळी पावसाने शेतातील पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here