बंगळुरु – कोरोना लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बंद असल्याने मुलाचे औषध आणण्यासाठी तब्बल 300 किलोमीटर सायकलवरून प्रवास करत वडिलांनी बंगळुरू गाठले.
कर्नाटकातील म्हैसूर जिह्यातील कोपल्लू गावातील आनंद हे रोजंदारीवर काम करतात. स्पेशल चाईल्ड असलेल्या त्यांचा मुलगा भैरव याच्यावर बंगळुरूच्या निमहंस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलासाठी आवश्यक असणारी औषधेसुद्धा बंगळुरू येथेच मिळतात. औषधाचा एखादा डोस चुकला तर मुलाच्या तब्येतीवर परिणाम होतो.
कोरोना लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बंद असल्याने आनंद हे काळजीत पडले होते. हलाकीच्या परिस्थितीमुळे खासगी वाहन करणे परवडणारे नाही. त्यामुळे आनंद यांनी सायकलच्या मदतीने मुलाचे औषध आणण्यासाठी तब्बल 300 किमीचा प्रवास केला. आपले गाव ते बंगळुरू दिवसरात्र असा सायकलचा प्रवास करून आपल्या स्पेशल चाईल्ड असलेल्या मुलासाठी त्यांनी औषध आणले.
मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत त्याला नियमित न चुकता औषध दिल्यास तो सामान्य मुलांसारखा होईल, असा विश्वास डॉक्टरांनी आनंद यांना दिला आहे. त्यामुळे मुलाच्या औषधात खंड पडणार नाही याची ते नेहमीच काळजी घेतात. दर दोन महिन्यांनी ते बंगळुरूला औषध आणण्यासाठी जातात.






