डॉ. पटवर्धन हॉस्पिटलची हुकूमशाही मोडीत; बाळंतपण आता कोळीवाडा हॉस्पिटलमध्येच!

पनवेल-सोगावकर – बाळंतपणासाठी उपचार नाकारणाऱ्या डॉ. पटवर्धन हॉस्पिटलची सर्वत्र नाचक्की झाल्याने त्यांची हुकूमशाही मोडीत काढून पूर्वाश्रमीची कोळीवाडा हॉस्पिटलची इमारत पुन्हा उपजिल्हा रुग्णालयाच्या नॉन कोविड गर्भवती माता प्रसूती केंद्रासाठी खुली करून दिली आहे. आज बुधवार (ता. 02) पासून सुरू होत आहे.

कोविड उपचारांमुळे सामान्य गर्भवती महिलांच्या प्रसूतीकरिता विनामूल्य सरकारी सुविधेचे दार बंद झाल्याने गैरसोय भेडसावत होती. ती दूर करण्यासाठी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी उपजिल्हा रुग्णालय प्रशासन, महापालिका आयुक्त, जिल्हाशल्यचिकित्सक, आरोग्य विभागाच्या उपसंचालक यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेने नव्याने प्रसूतीकरीता लागू केलेल्या योजनेंतर्गत शहरातील डॉ. प्रभाकर पटवर्धन हॉस्पिटलसोबत उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने मौखिक करार केला. मात्र, पटवर्धन हॉस्पिटलच्या प्रशासनाने दोन अडलेल्या महिलांना केवळ आधारकार्ड नसल्याचे सांगून बाळंतपण नाकारल्याच्या घटनेला पनवेल संघर्ष समितीने चव्हाट्यावर आणले. त्यातून डॉ. पटवर्धन हॉस्पीटलची चांगलीच जिरली.

पनवेल संघर्ष समितीचे ठोस कार्य
कोविडच्या पहिल्या लाटेत प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांच्याशी सतत पाठपुरावा करून 15 खाटांसह नवी सामुग्री उपलब्ध करून घेतली होती. त्याशिवाय सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघिलकर यांना कांतीलाल कडू यांनी सांगून इन्व्हरटर यंत्रणाही बसवून घेतली आहे. अनेक शर्यतींचा सामना करून ते केंद्र सुरू केल्यानंतर 125 बाळं तिथे जन्माला आली आहेत. मात्र गलिच्छ राजकारण आड आल्याने पटवर्धन हॉस्पिटलचा पर्याय दिला आणि यंत्रणेचा बोऱ्या वाजला. पनवेल संघर्ष समितीने पुन्हा आवाज उठविल्यानंतर आता बुधवारपासून पुन्हा चिमुकल्यांचा आनंद देणारा आवाज कोळीवाडा रुग्णालयात ऐकायला मिळणार आहे.

पनवेल संघर्ष समितीला नॉन कोविड हॉस्पिटल सुरू केल्याचे श्रेय जावू नये म्हणून अनेकांनी कारस्थाने केली. परंतु, गैरसोय दूर करायला कुणीच पुढे आले नाही. अखेर सामान्य घरातील, गरीब, आदिवासी, आर्थिक दृष्ट्या मागास समाजातील गर्भवती महिलांसाठी पुन्हा कांतीलाल कडू यांनी कंबर कसली. उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. सचिन संकपाळ यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे कोळीवाडा इमारतीसाठी प्रस्ताव पाठविला आणि त्यांनी तो तातडीने मंजूरही केला. त्यानंतर महापालिकेच्या मालकीची कोळीवाडा येथील दवाखान्याची इमारत उपजिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात देण्यात आली आहे. येत्या. बुधवारपासून तिथे नॉन कोविड गर्भवती महिलांसाठी पुन्हा प्रसूती केंद्र सुरू होत आहे.

आज सकाळपासून सामानाची जमवाजमव करण्यात आली. पुन्हा नव्या जोमाने सेटअप लावण्यात आला आहे. त्यामुळे नॉन कोविड गर्भवती मातांच्या बाळंतपणाची गैरसोय दूर झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here