भाजपा आक्रोश आंदोलन : १०० हून अधिक कार्यकर्त्यांवर कारवाईचे आदेश

बुलडाणा (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्यावतीने ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केल्याबद्दल महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, या आंदोलनास कोणतीच परवानगी नसल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना हे आंदोलन चांगलच महागात पडलं आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी दिले आहेत.

यावेळी आंदोलनात भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सिंधुताई खेडेकर यांच्यासह जवळपास १०० पदाधिकारी हजर होते. जिल्हाधिकारी कार्यलयासमोर गर्दी करून कोविडच्या धर्तीवर कुठलीही परवानगी नसताना भाजपच्यावतीने कोविड नियमाचे उल्लंघन करीत सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.

यामुळे या आंदोलनावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी शहर पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झाल्यानंतर भाजपने ठाकरे सरकारला धारेवर धरलं. आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा वाद सध्या राज्यात पेटला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here