अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण त्यांना परत मिळवून द्या या मागणीसाठी आज अलिबाग येथे भाजपातर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले तसेच तहसीलदार व निवासी जिल्हाधिकारी यांना भाजपातर्फे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आपण व आपला परिवार खुशाल असेल अशी आशा करतो. काही दिवसांपूर्वी मानानीय सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण, यासंदर्भातील आपल्या सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली. आपणास देखील या गोष्टीची माहिती आहेच. परंतु, आपण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीत. खरतर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या हातात ठोस काही असणे आवश्यक असते, आपल्याकडे ते नाही! म्हणूनच आपण प्रतिक्रिया देणे टाळले.
दिनांक १२ डिसेंबर, २०१९ या दिवशी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या राज्य सरकारला ओबीसी आरक्षणा संदर्भाने काही आदेश दिले होते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला बजावून सांगितले होते की, “लवकरात लवकर ‘राज्य मागासवर्गीय आयोगाचे’ गठन करावे. राज्यातील ओबीसी समाजाचा ‘Empirical Data’ जमा करून तो तत्काळ न्यायालयास सादर करावा.” न्यायालयाच्या या आदेशाला जवळपास पंधरा महिने झाले मात्र आजूनही आपण साधे राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन देखील केलेले नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

१२ डिसेंबरला नंतर देखील आपल्या सरकारला माननीय सर्वोच्च न्यायालयाने जवळपास दहा ते बारा तारखा दिल्या! एकही तारखेला आपले सरकार न्यायालयाने दिलेल्या आदेशांची पूर्तता करून न्यायालयात हजार राहिले नाही. आणि तुम्ही देखील या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घातले नाही.
गेल्या पंधरा महिन्यात, आमचे नेते व विधानसभेचे विरोधीपक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळपास पाच ते सात वेळा पत्राद्वारे आपल्याला माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा च्या वतीने अनेक वेळा आम्ही आपणास पत्र दिले. आमच्या एकही पत्रावर आपल्याकडून उत्तर आले नाही. आपल्याकडून त्यावर कोणतीही कारवाई देखील करण्यात आली नाही.
आपल्याला विरोधकांची जराही किंमत नाहीच. मात्र ओबीसी समाजाला देखील तुम्ही क्षुल्लक समजत आहात! एवढेच नाही तर आपल्याकडून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा वारंवार अवमान केला गेला. याचाच फटका ओबीसी समाजाला बसला आहे. गेली पंधरा महिने सरकार फक्त कोर्टात जाऊन पुढची तारीख मागत होते.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा आपल्याला चेतावणी देत आहे! लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करा! तसे झाले नाही तर आमच्याकडे आंदोलना शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण आम्ही मिळवूनच राहू. आमच्या ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही.
तहसीलदार, निवासी जिल्हाधिकारी यांना देताना भारतीय जनता पार्टी दक्षिण विभाग अध्यक्ष माननीय महेश मोहिते, ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, भारतीय जनता पार्टी अलीबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे राज्य परिषद सदस्य सतीश लेले, कुडूस ग्रामपंचायत सरपंच अनंत पाटील. मानकूळे सरपंच सुजित सुजितजी गावंड, अलिबाग उपाध्यक्ष आदित्य नाईक, अलिबाग सरचिटणीस .निखिलजी, अलिबाग . संघटन सरचिटणीस संतोष पाटील, युवा सरचिटणीस अजिंक्य पाटील.देवानची सोनवणे, जगदीशजी कांबळी, आधी भारतीय जनता पार्टीचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते






