लसीकरणासोबत प्रमाणपत्र द्यावे; पनवेल संघर्ष समितीची जिल्हाधिकारी, आयुक्तांकडे मागणी

पनवेल-सोगावकर – सरकारी व खासगी लसीकरण केंद्रावर लस दिल्यानंतर ताबडतोब लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख यांच्याकडे काल, बुधवारी (ता. 02) पत्राद्वारे केली आहे.

पासपोर्ट, आधारकार्डइतकेच लसीकरण प्रमाणपत्र भविष्यात महत्वाचे दस्तऐवज ठरणार असल्याचे सांगत कडू यांनी लसीकरण केंद्रावर प्रिंटरची व्यवस्था करून लस घेतल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याच्या हाती तापाच्या गोळ्यांसोबत महत्वाचे असलेले प्रमाणपत्र दिले पाहिजे, असे चौधरी आणि देशमुख यांना कळविले आहे.

शहरी आणि ग्रामीण भागातील सरसकट नागरिकांकडे मोबाईल, संगणक, लेपटॉप आदी यंत्रणा उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील आदिवासी, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आणि वाड्या-पाड्यां तसेच शहरी भागातील झोपडपट्टी, मोलकरीण, हातावर पोट कमावणारे, नाका कामगार, रिक्षा चालक तसेच इतर घटकांसह बेरोजगारांकडे प्रमाणपत्र डाऊनलोड करणारी यंत्रणा नसल्याने त्यांचे वांदे झाले आहे.

आरोग्य सेतूच्या अध्यादेशाप्रमाणे लस घेतलेल्या लाभार्थ्यांना तातडीने प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे कोणत्याच शासकीय केंद्रावर प्रमाणपत्र दिले जात नाही. खासगी डॉक्टर अव्वाच्या सव्वा दर घेवून लस टोचून देत आहेत. परंतु त्यांच्याकडूनही प्रमाणपत्र दिले जात नसल्याने सर्वांचीच गैरसोय आज होत आहे. याबाबत नागरिकही अनभिज्ञ आहेत.

त्यांच्यादृष्टीने आज कोविडच्या भीतीयुक्त वातावरणात लस महत्वाची आहे, प्रमाणपत्राच्या आवश्यकतेबाबत त्यांना फार उत्सुकता दिसत नाही किंवा ते अनभिज्ञ आहेत असे म्हणावे लागेल. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रावर ताबडतोब प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती कांतीलाल कडू यांनी संबंधितांना केली असून त्याची प्रत पालकमंत्री आदितीताई तटकरे यांना पाठविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here