कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – मेघगर्जनेसह आलेल्या मुसळधार पावसाने आज कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांना झोडपून काढले. तुफान झालेल्या पावसाने शहरात पाणी साचले, रस्ते तुंबले आणि अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. बहुतांश ठिकाणी झाडे पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यात पोल्ट्रीची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतही दमदार पाऊस झाला. सोलापुरातील सांगोला तालुक्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला.
मेघगर्जनेसह आलेल्या मुसळधार पावसाने आज कोल्हापूरकरांना झोडपले. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असला तरी अनेकांच्या घरांत पाणी शिरले. काही ठिकाणी झाडे कोसळून मार्ग बंद झाले. विजेचा पुरवठाही काही काळ खंडित झाला होता. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वळीवासह तौकते चक्रीवादळाच्या पावसाने हजेरी लावली होती. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस कोसळत आहे. आज दुपारी तीननंतर पावसास सुरुवात झाली. मुसळधार आलेल्या पावसाने दोन तास कोल्हापूरकरांना झोडपून काढले. गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, शेतीकामांना वेग आला आहे.
सांगली शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागांत आज जोरदार पाऊस झाला. या पावसाने सांगली शहरात रस्त्यावर पाणीच पाणी झाले. सखल भागात पाणी साचल्याने अनेक रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. सांगली शहर व जिल्ह्यात अनेक भागांत सकाळपासून उन्हाची तीव्रता होती. दुपारनंतर पाऊस सुरू झाला. सांगली शहरात जवळपास दीड तास मुसळधार पाऊस कोसळत होता. शहरात शिवाजी मंदिर परिसर, स्टेशन रोड, स्टॅन्ड परिसरात पाणीच पाणी झाले. सांगली शहराप्रमाणेच कवठे महांकाळ, जत, पलूस, मिरज तालुक्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
वादळी वारे व मुसळधार पावसात सांगोला-अकलूज रोड वरील भारतीय संस्कृती ज्ञानमंदिर या निवासी आश्रमशाळेच्या 8 वर्गखोल्यांचे पत्रे, अँगल उडून 200 फुटांवर फेकले गेले. या घटनेत पत्रे, लोखंडी अँगल, शालेय साहित्य, 3 टीव्ही, 3 संगणक संच, 16 सीसीटीव्ही कॅमेरे आदी मिळून सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.






