लोकसभा वगळता सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढवून कार्यकर्त्यांना ताकद देणार

महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचा प्रदेशाध्यक्षांच्या ‘सुरात सूर’

पनवेल-सोगावकर : राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्षपदी स्वतंत्र विचाराचे नानाभाऊ पाटोेले यांची नियुक्ती करून शिवसेनेसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कुरघोडी करण्याचा डाव टाकला होता, हे राजकीय जाणकारांचे मत सत्यात उतरताना दिसत आहे. पाटोले यांनी पदभार स्वीकारल्यापासून कॉंग्रेस, मित्र पक्षांसोबत फरफटत जाणार नाही याची चुणूक दाखवायला प्रारंभ केला आहे. त्यात आता त्यांचे सहकारी, प्रदेश उपाध्यक्ष, कोकणचे शिलेदार आणि माजी आमदार माणिकराव जगताप यांनीही पाटोले यांच्या ‘सुरात सूर’ मिसळला आहे. त्यांच्याशी दै. निर्भीड लेखचे संपादक कांतीलाल कडू यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा…!👇👇

प्रश्न: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांनी दिला आहे. यातून नेमका संदेश काय द्यायचा आहे महाराष्ट्राला?
जगताप: स्पष्ट संकेत आहेत, कॉंग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावर आहे. खेडोपाड्यात आहे. हाताचा पंजा सर्वांना ठावूक आहे. मागील काही वर्षापासून राष्ट्रवादी आणि समविचारी पक्षाशी आघाडी करण्याचा वरिष्ठांनी निर्णय घेतला, कार्यकर्त्यांनी तो आदेश मानून काम केले. त्यात संमिश्र यश आले. काही ठिकाणी ताकद असताना तिकीट वाट्याला न आल्याने नुकसान झाले. पक्षाची आणि कार्यकर्त्यांचीही सामाजिक-राजकीय हानी झाली. भविष्यात त्या चुका सुधारून पुढे जाण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांनी केला आहे. सर्वांना सोबत घेवून पुढे जायचे ठरले आहे. त्यांचा निर्णय नक्कीच कॉंग्रेसला तारणारा ठरेल.

प्रश्न: राज्यात मतविभाजन होण्याचा धोका वाटत नाही का? विरोधकांना संधी मिळेल, असे नाही वाटत?
जगताप: कसे आहे आपण कोकणापुरते जरी पाहिले तरी माजी मुख्यमंत्री बॅ.अंतुले यांचा श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ वाटाघाटीत राष्ट्रवादीला गेला. रायगड लोकसभा त्यांच्याकडे गेला, नव्याने झालेला मावळही गेला. मग कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पायावर सतत डोकं ठेवायचे का? इथे आजही कॉंग्रेसची ताकद आहे. अंतुले यांची पुण्याई कॉंग्रेसला तारु शकते. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त माजी मुख्यमंत्री,आजी- माजी मंत्री आणि ताकदवान नेते कॉंग्रेसकडे आहेत. तेव्हा स्वतंत्ररित्या पक्ष लढल्याने आतापर्यंत नेत्यांसाठी लढलेल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची मोठ्या प्रमाणात तिकिटे मिळतील. कार्यकर्ते मनापासून पुन्हा पक्षाची निवडणूक लढवून यश खेचून आणतील. राहिला प्रश्न विरोधी पक्षाचा. कॉंग्रेसला गेल्या सत्तर वर्षात भाजपाचे भय वाटले नाही. आता वाटण्याचे कारण नाही. एकच पक्ष सतत सत्तेवर असला की, जनमानसात गैरसमज होत असतात. आता त्यांचा भ्रमनिरास दूर झाला आहे. अच्छे दिन जनतेने पाहिले आहेत. तेव्हा पुन्हा त्यांना संधी मिळणार नाही.

प्रश्न: सत्तेत एकत्र आणि निवडणुकीत तोंड फिरवायची ही भूमिका मतदार स्वीकारतील असे वाटते का?
जगताप: स्थानिक स्वराज्य पातळीवर नेता पाहून मतदान होतो. पक्षाची ताकद जोडीला असतेच. शिवाय प्रत्येकाला पक्ष वाढीचा अधिकार आहे. मतदारांचा आजही कॉंग्रेस आणि पंजावर विश्वास आहे. त्यामुळे विधानसभेच्या 288 जागा लढवून स्वबळावर सत्ता काबीज करण्याची उर्मी प्रदेशाध्यक्ष पाटोळे यांनी ठेवली असून त्यांनी व्यूहरचना आखली आहे. तो प्रस्ताव दिल्लीत पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी, राहूल गांधी, वेणुगोपाल आणि कमिटी सदस्यांपुढे ठेवला आहे. त्यांनी होकार दिल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. आणि लोकसभेच्या निवडणुका आघाडी म्हणून लढवायच्या आहेत.

प्रश्न: राज्यात सत्तेत असूनही कॉंग्रेसचे फारसे अस्तित्व जाणवत नाही. मंत्री संथ गतीने वागतात. राष्ट्रवादी सेनेच्या एक पाऊल पुढे आहे.
जगताप: कॉंग्रेसचे सर्व मंत्री अनुभवी, प्रशासकीय कामकाजात तरबेज आहेत. त्यांची नाळ नागरिकांशी जोडली आहे. ते जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. त्यांचा करिष्मा लवकरच दिसेल. राष्ट्रवादी मित्र पक्ष असला तरी त्यांचे नेते काम करतात, त्यांची शैली वेगळी. सेनेची लकब वेगळी आहे. यात कॉंग्रेस उजवी ठरेल.

प्रश्न: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेसला पसंती नाही मिळाली तर विधानसभेच्या वेळी निर्णय बदलून तीन पक्षांची आघाडी करून लढणार?
जगताप: जर-तरचा प्रश्न नाही. निर्णय झाला आहे. तीर सुटला आहे, तो मागे घेता येत नाही. आता कॉंग्रेस स्वबळावर लढणार, यश प्राप्त करणार. तेव्हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र लढायचे की परस्परविरोधी हा त्यांचा निर्णय आहे, तो त्यांनी घ्यायचा आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. पक्षांतर्गत काही निवडी होतील. नव्याने कमिटीची बांधणी होईल. काही अंतर्गत फेरबदल केले जातील आणि मग जबाबदारी निश्चित करून पुन्हा नव्याने पाटोले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची बांधणी केली जाईल. कार्यकर्ते, स्थानिक नेते स्वबळाच्या निर्णयावर खुश आहेत.

प्रश्न: कोरोना, चक्रीवादळ आणि नैसर्गिक आपत्तीच्या संकटात देश आहे. नागरिक भयभीत झाले आहेत आणि राज्य सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. हे योग्य वाटते का?
जगताप: धुसफूस वगैरे नाही. काही मुद्द्यांवर कॉंग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. काही निर्णयावर राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर अशोकराव चव्हाण संवेदनशील आहेत. नैसर्गिक आपत्तीबाबत बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील जिल्हाधिकारी यांना शेवटच्या घटकांना मदत देण्याचे आदेश दिले आहेत. पुनर्वसनाचा निर्णय झालेला आहे. अंमलबजावणी सुरू आहे. यातून कॉंग्रेसच्या मंत्र्यांची नाराजी नव्हे तर जनहिताची कामे समोर आली आहेत. हेच भविष्यातील निवडणुकांना रसद पुरविणारे निर्णय ठरतील.
महाराष्ट्रात कॉंग्रेसला पुन्हा सोनियाचे दिवस येतील आणि देशाला आपले राज्य पक्षीय ताकद देईल. त्याकरिता राहुल गांधी यांनी नानाभाऊ पाटोले यांची केलेली निवड सार्थ ठरेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here