मुंबईत लोकल सर्वसामान्य आणि महिलांसाठी बंदच; हॉटेल आणि दुकाने सायंकाळी 4 पर्यंत सुरू

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – कोरोना आटोक्यात आल्यामुळे राज्य सरकारने कडक केलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यास सुरुवात केल्यामुळे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीदेखील ‘तिसऱया गटा’तील मुंबईसाठी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये दुकाने, हॉटेल दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र या ठिकाणी कोरोना खबरदारीचे सर्व नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी शनिवार-रविवार आणि सायंकाळी 5 नंतरची संचारबंदी कायम राहणार आहे. मॉल, थिएटर, नाटय़गृहेही बंदच राहणार आहेत.

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी चाचण्यांच्या प्रमाणात असणारा पॉझिटिव्हिटी रेट पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान असल्याने मुंबईचा समावेश ‘तिसऱया गटा’त झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवडाभर, तर इतर सर्व प्रकारची दुकाने शनिवार-रविवार वगळून सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल 50 टक्के ग्राहकांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजेपर्यंत आणि त्यानंतर होम डिलिव्हरी आणि पार्सल सुविधा सुरू ठेवता येणार आहे. शनिवार-रविवार याला बंदी असेल.

रेल्वे प्रवासाची सुविधा केवळ अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित लोकांनाच राहणार असून महिलांनाही सरसकट प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. लोकल प्रवासाबाबतचे अधिकार पालिकेलाच असल्यामुळे पालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय मुंबई महानगर क्षेत्राला लागू राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लोकलमधून सध्या तरी राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार प्रवास करता येणार आहे. दरम्यान, ‘बेस्ट’मध्ये 100 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी उभ्याने प्रवास करता येणार नाही.

अशी आहे नियमावली
मुंबईत सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमाव बंदी, संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी असणार आहे.
बायो बबलमधील चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. मात्र, संध्याकाळी 5 नंतर फक्त इनडोअर शूटिंग.
जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के उपस्थितीत. दुपारी 4 पर्यंत. फक्त अपॉइंटमेंटने. एसीला बंदी.
सार्वजनिक उद्याने, मैदाने, सायकलिंग आणि मॉर्निंग वॉक परवानगी – पहाटे 5 ते सकाळी 9
मैदानी खेळ – पहाटे 5 ते सकाळी 9, संध्याकाळी 6 ते रात्री 9
लग्नसमारंभ – 50 व्यक्तींची उपस्थिती, दोन तासांची अट रद्द.
बांधकाम – बांधकामाच्या ठिकाणी कामगार उपलब्ध असल्यास किंवा बाहेरुन कामगार आल्यास संध्याकाळी चारपर्यंत
अंत्ययात्रा – 20 माणसांची उपस्थिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here