मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रविवारी खासगी दूरदर्शन वाहिन्या आणि चित्रपट निर्माता, कलावंत संघटनांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.
मनोरंजन क्षेत्राचे काम सुरळीत व अव्याहत सुरू राहिले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतली. त्या अनुषंगाने सातत्याने या क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठकाही घेतल्या. सोमवारपासून टप्प्यानुसार महाराष्ट्र अनलॉक होणार आहे. चित्रीकरणालाही राज्य सरकारने काही नियम व अटींवर परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करतील.
उद्याच्या बैठकीत शिवसेना सचिव आदेश बांदेकर, खासदार अमोल कोल्हे, सोनी वाहिनीचे दानीश खान, स्टारचे गौरव बॅनर्जी, कलर्सच्या मनीषा शर्मा, झीचे अमित शहा, आयएफटीसीचे नितीन वैद्य, आयएफटीडीएचे अशोक पंडित, सिंटाचे अमित बहल, प्रोडय़ुसर्स गिल्डचे नितीन आहुजा, इम्पाचे टी. पी. अगरवाल आदी या संवादसत्रात सहभागी होणार आहेत.






