कांदा उत्पादकांना आता कोणीही हलक्यात घेऊ नका
नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) – आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ अशी ओळख प्राप्त झालेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी 3 जून 2021रोजी कांदा लिलाव सुरू असतांना कांदा व्यापारी कांद्याचे लिलाव करण्याचे अर्ध्यावर सोडून निघून गेले कारण काय तर नाफेडची कांदा खरेदी करणाऱ्या कृषी साधना संस्थेने चालू लिलावात नाफेडसाठी कांदा खरेदी बोली लावण्यास सुरुवात केली.
याबाबत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांचे कृषी साधना संस्थेच्या अध्यक्ष साधना जाधव व कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या सर्वांचे नेमके काय म्हणणे आहे ते नाशिक जिल्ह्यातील सर्वच वृत्तपत्रांमध्ये सविस्तर छापून आलेलेच आहे तसेच टीव्ही चॅनलवरील बातम्यांमधून आपल्या पर्यंत या माहीती पोहोचलीच आहे.
मुळामध्ये कांद्याचे लिलाव सुरू असतांना कांदा व्यापाऱ्यांनी मध्येच कांदा लिलावर बहिष्कार टाकून बाजार समितीतून निघून जाणे हे पुर्णपणे चुकीचेच होते आणि याला संपूर्णपणे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच जबाबदर आहे. निम्म्यापेक्षा अधिक वाहनांचा लिलाव झालेला असतांना कृषी साधना संस्थेने नाफेडसाठी कांदा खरेदीची बोली लावल्यानंतर व्यापार्यांनी तात्काळ लिलावावर बहिष्कार न टाकता शिल्लक राहिलेल्या वाहनांचे लिलाव करून सकाळच्या सत्रातील लिलाव आटोपल्यानंतर याबाबत बाजार समिती व कांदा व्यापारी यांची बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढता आला असता जो तोडगा मध्येच लिलाव बंद करून नंतर काढला गेलाही दुसऱ्या दिवशी 4 जूनला कृषी साधना संस्थेला कांदा खरेदी करूनही देण्यात आली
मग नेमके मध्येच असा लिलाव थांबवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्रास का दिला गेला लासलगाव बाजार समितीची परवानगी असल्याशिवाय कृषी स्थापना संस्थेने लिलावात तर भाग नक्कीच घेतला नसेल 3 जूनला कांदा उत्पादकांना त्रास देण्याचा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जो प्रकार घडला तो पूर्णपणे चुकीचा असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या कुटुंबातील तरुणांची मोठी फळी आता कांदा शेती करत असतांना या कांदा उत्पादक तरुणांना आता कोणीही हलक्यात घेऊ नये त्यांना आता सर्व काही समजते त्यामुळे बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांच्या हातातील बाहुले न बनता या पुढील काळात बाजार समित्यांनी आपापली जबाबदारी ओळखून कांद्याचे लिलाव विनाअडथळा पार पाडावे अन्यथा येणाऱ्या काळात ज्या ज्या बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी विरोधी कृती घडेल त्या त्या बाजार समितीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून कायमचा बहिष्कार टाकण्यात येईल तिथे एकही कांदा उत्पादक आपला कांदा विक्रीसाठी घेऊन येणार नाही याची आता लासलगावसह महाराष्ट्रातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी नोंद घ्यावी तसेच कांदा व्यापाऱ्यांनीही ज्या कांदा उत्पादकांमूळे आपल्याला व्यापार करायला मिळतो त्यांनाच त्रास होईल अशी कृती करू नये, असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले आहे.






