महिला ग्रामसेविका व सदस्यांमध्ये भर रस्त्यात तुफान हाणामारी

भंडारा – जिल्ह्यातील सिलेगाव ग्रामपंचायत येथिल महिला ग्रामसेविका व महिला सदस्य यांच्यात जोरदार हाणामारी पाहण्यास मिळाली आहे. त्यांच्या या हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यामध्ये महिला सरपंचाचा सुद्धा समावेश आहे. सदर ग्रामपंचायत तुमसर पंचायत समितीमध्ये येते.

सिहोरा पोलिस ठाण्यात या घटनेप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ग्रामसेविका मंजूषा सहारे, सरपंच संध्या पारधी व महिला सदस्य मनीषा राहंगडाले यांचा या हाणामारी मध्ये समावेश आहे. यांच्यात घरकुल वाटपाच्या ठरावावरून वाद झाला होता.

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, घरकुल वाटपाच्या ठरावावरून वाद होऊन प्रोसिडिंग कॉपी मागण्यावरुन महिला सरपंच संध्या पारधी व महिला ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्या वाद वाढला. त्यात सरपंच संध्या पारधी यांनी ग्रामसेविका मंजूषा सहारे यांच्याकडून प्रोसिडिंग कॉपी हिसकवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे वाद आणखी चिघळला. दरम्यान ग्राम पंचायत महिला सदस्य मनीषा राहंगडाले यांनी ग्रामसेविका यांना अपशब्द बोलल्याने महिला ग्रामसेविका व महिला सदस्य यात तूफान हाणामारी झाली. सरपंच व इतर सदस्यांनी महिला ग्रामसेविका सहारे यांना मारहाण केली आणि प्रोसिंडिंग कॉपी हिसकावून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here