बुलडाणा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मेहकर बाजार समितीचे शिवसेनेचे संचालक पुंजाजी नारायण कान्हे (48) यांचा काल रात्री नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला आहे. बाजार समिती संचालक संजय सवडतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर बाजार समितीचे संचालक पुंजाजी कान्हे हे तालुक्यातील सारशीव येथे राहतात. काल त्यांच्या मुलीची डिलिव्हरी बुलढाणा येथे होऊन मुलगा झाला आहे.
त्यांना भेटण्यासाठी ते मोटरसायकल वर बुलढाणा गेले होते. परत मंगरूळ नवघरे मार्गे येताना त्यांनी घरी कोणी नसल्याने सावरखेड वरुन सारशीव न येता सासुरवाडीला डोंगरगावकडे वळले. सावरखेड जवळ डोंगरगाव रस्त्यावर छोट्या नाल्याला रात्री अंदाजे साडेआठ चे दरम्यान परिसरात पाऊस झाल्याने पूर आला होता.पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी नाल्याच्या पाण्यात मोटरसायकल टाकली व ते वाहून जात समोर बोगद्यात अडकले. मात्र या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी ही बाब उघडकीस आली.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. या घटनेबद्दल शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना आमदार संजय रायमुलकर, मेहकर बाजार समिती सभापती माधवराव जाधव, उपसभापती बबनराव तुपे, सचिव संजय बार्डेकर, संचालक राजू चव्हाण सह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी दु:ख व्यक्त केले आहे.






