- पर्यावरणदिना निमित्त पर्यावरण इ विशेषांकाचे प्रकाशन संपन्न
- जागतिक पर्यावरणदिनी ऑनलाईन काव्यसंमेलनाच्या माध्यमातून झालेल्या जनजागृतीस प्रचंड प्रतिसाद
ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणसमस्या आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू धरून साहित्यसंपदातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . विशेष बाब म्हणजे सदर उपक्रम संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यावरण विभागाच्या नियोजित उपक्रमा मध्ये नोंदणीकृत होते .
लॉकडाऊनमुळे सामाजिक बंधने असताना ,ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमाची सुरवात झाली .कार्यक्रमाच्या उद्धघाटन प्रसंगी जेष्ठ साहित्यिक आणि गझलकार ए. के. शेख, जेष्ठ साहित्यिक रायगडभूषण एल. बी पाटील उपस्थित होते. साहित्य आणि पर्यावरण संवर्धन ह्यांची सांगड कशी घालावी ,साहित्याच्या माध्यमातून पर्यावरणसंवर्धनास कशी चालना द्यावी ह्याचे मार्गदर्शन शेख सरांनी उपस्थित साहित्यिकांना केले .आपल्या सुंदर कवितेतून त्यांनी उपस्थितांच्या मनावर गारुड घातले .आजच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी , मनोबल वाढवले पाहिजे असे सांगितले . त्यासाठी निसर्गाशी एकरूप होताना पर्यावरणाकडून घेण्यासारखे खूप आहे असे मत त्यांनी व्यक्त केले . तसेच साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे ह्यांच्या धडपडीचे कौतुक केले .
रोहिदास घोडेकर ,(सी.ओ.ई horticulture ,रिलायन्स ) ह्यांनी उपस्थितांना पर्यावरणसंस्थेची उकल करून दाखवली .अगदी सहज, सोप्या भाषेत क्लिष्ट विषय त्यांनी उपस्थितांना समजावून दिला .जैवविविधता आणि इतर विषयांचे महत्व त्यानी सोदाहरण स्पष्ट केले .औद्योगिक क्षेत्रात पर्यावरण संवर्धनासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली .वृक्षलागवड करताना आणि संवर्धन करताना कोणती काळजी घ्यावी हे त्यांनी आपण केलेल्या कार्यातून दर्शवून दिले. वैशाली झोपे ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .रिलायन्स समूहाचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे ह्यांनी आपण पर्यावरण क्षेत्राशी निगडित केलेल्या कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली .छोट्या छोट्या गोष्टीतून पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी हे सांगताना भावी पिढीच्या वाढणाऱ्या सहभागाचे कौतुक केले .त्याचबरोबर साहित्यसंपदा भावी पिढ्यांसाठी करत असलेल्या कामाचे कौतुक करत केवळ साहित्यापुरते मर्यादित न राहता साहित्यसंपदा खऱ्या अर्थाने साहित्य आणि समाज ह्यांची सांगड प्रत्यक्ष कृतीद्वारे घालत आहे असे गौरवोद्गार ही त्यांनी काढले. सदर कार्यक्रमास औद्योगिक क्षेत्रातील आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली ,त्या अंतर्गत पर्यावरण प्रमुख शिशिर मेहता आणि हेल्थ आणि सेफ्टी वरिष्ठ व्यवस्थापक राजू पैनाईक , व्यवस्थापक शरद जाधव ह्यांची विशेष उपस्थिती लाभली .
जेष्ठ साहित्यिक आणि रायगडभूषण प्रा. एल . बी पाटील ह्यांनी ह्यांनी साहित्याच्या माध्यमातून पर्यावरण विषयांबाबत जनजागृती करताना सद्य परिस्थितीचे परखड चित्र उभे केले .आपल्या बहारदार कवितेतून त्यांनी उपस्थितांना खिळवून ठेवले .सामाजिक पर्यावरणाचा तोल सांभाळायचा असेलतर अश्या प्रकारे जन जागृतीची मोठ्या प्रमाणे आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले . पर्यावरण संस्थेतील प्रत्येक घटक महत्वपूर्ण असून त्याची जोपासना करावी असे आवाहन श्रोत्यांना केले. साहित्यसंपदाच्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक करताना त्यांनी अशा चळवळींच्या माध्यमातून समाजात नक्कीच बदल होतील अशी भावना व्यक्त करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .सदर उदघाटन सोहळ्यावेळी निमंत्रितांचे काव्यवाचन पार पडले तसेच पर्यावरणदिना निमित्त “पर्यावरण इ विशेषांकाचे ” प्रकाशन पार पडले .उपक्रम कार्यवाहक म्हणून वंदना मत्रे ह्यांनी जवाबदारी पार पाडली . मनोमय मीडिया ह्यांनी नियोजनाची जवाबदारी पार पाडली तर डॉ विशाल बिसेन ह्यांनी तांत्रिक सहाय्य केले.
उद्घाटनानंतर निमंत्रितांचे काव्यसंमेलन पार पडले . महाराष्ट्रातील विविध भागांतील कवींचा सहभाग ही लक्षणीय बाब ठरली . शंतनू पुराणिक पुणे ,अनिता गुजर मुंबई ,रवींद्र सोनावणे रायगड, पत्रकार कवी लेखक सुभाष शांताराम जैन ठाणे, ह्यांनी आपल्या बहारदार कवितांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. रसिका लोके ह्यांनी स्वागत प्रमुख आणि समन्वयक म्हणून सोनाली शेडे ह्यांनी म्हणून काम पहिले .पर्यावरण दिना निमित्त साहित्यसंपदाच्या माध्यमातून “झाडे लावूया ” पर्यावरण गीत प्रसिद्ध करण्यात आले असून राष्ट्रसंघ पर्यावरण विभागाच्या जागतिक उपक्रमास समरर्प्रित करण्यात आले . संतोष सकपाळ ह्यांनी सदर गीताचे लेखन केले असून त्यांच्याच सुमधुर आवाजातील सदर गीत साहित्यसंपदा डिजिटल पर्व युट्युब चॅनेलवर बघता येईल.
दिवसभर सुरु राहिलेल्या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळाले असून त्या अंतर्गत पहिले मानवनिर्मित अभयारण्य निर्माण करणाऱ्या वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या कार्याची ओळख आणि अभयारण्य निर्मितीच्या प्रवासाबद्दल त्यांचे सुपुत्र रानकवी सु. धो. मोहिते ह्यांनी करून दिली गेली .”पंचतत्वातील पर्यावरण” या विषयावर प्रा.कमलाकर मोरे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हाध्यक्ष ह्यांनी मार्गदर्शन केले .
पर्यावरण क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या माणसांची आणि संस्थांची ओळख, निबंध आणि लेखातून मागविण्यात आली होती .त्यातील निवडक लेखकांना त्यांचे साहित्यवाचनाची संधी मिळाली .महिलांनी सगळी क्षेत्र पादक्रांत केली असताना ,शेतीत सुद्धा आपल्या प्रतिभेचा ठसा त्या उमटवीत आहेत ,हेच हेरून सेंद्रियशेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन गावातील इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास प्रवृत्त करणाऱ्या ऋजुता तायडे जि.यवतमाळ ,ह्यांच्या अभिनव कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली .आपल्या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून शेतीविषयी विविध प्रयोग राबविणाऱ्या ,अमित तायडे ह्यांच्या ह्यांच्या सहकार्याने मातीचे आधुनिक शेती आणि मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन कसे करावे आणि पर्यावरणाची बिघडलेली गाडी सुरळीत कशी आणावी ह्याचे दाखले दिले गेले .वृक्षांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या ,पर्यावरण संवर्धनास झटणाऱ्या दिलीप मोकल आणि स्मित शिवदास ह्या महाराष्ट्रातील अवलियांची ओळख करून दिली गेली .विशेष म्हणजे महिलांचा वाढता सहभाग हे ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे .
“नामशेष होत जाणाऱ्या प्रजातींच्या विकासात प्रोत्साहन/संकटात सापडलेल्या प्रजातींना मदत करणे ” या चर्चासत्राच्या माध्यमातून महिला प्राणी पक्षी ह्यांची परिसंस्था कशी पूर्ववत करता येईल ह्या बद्दल आपली मतं मांडली . प्रांजली मोहिते ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाली शेडे आणि रेश्मा पवार यांची विशेष उपस्थिती लाभली .
बालपणापासूनच मुलांची पर्यावरणाशी मैत्री व्हावी म्हणून “वृक्ष माझा मित्र” ,वृक्षावरोपण स्पर्धा सुद्धा पार पडली . संस्कार संपदाच्या माध्यमातून भावी पिढी घडविण्यास कार्यरत असणाऱ्या चित्ररेखा जाधव ,हनुमंत देशमुख ह्यांनी पर्यावरण विषयक विविध स्पर्धांचे बालकांसाठी उत्तम आयोजन केले .
अखंड 12 तासांपेक्षा जास्त चाललेल्या ह्या पर्यावरण विषयक जन जागृती अभियानाची सांगता वैभव धनावडे ह्यांच्या आभार प्रदर्शनाने झाली .साहित्यसेवा करत असताना “आपण पर्यावरणाचे सुद्धा देणे लागतो” .भावी पिढ्यांकरीता प्रत्येकाने पर्यावरणाची घडी पूर्वपदावर आणण्यासाठी काही कृतिशील कार्यक्रम राबवावेत ,ह्याच संकल्पनेतून आपण उपक्रमाची आखणी केली असे मत संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी व्यक्त केले. विविध आयामी आणि विविधतेने नटलेल्या ह्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे . अशी माहिती संस्थापक वैभव धनावडे यांनी दिली.






