शेकापच्या बालेकिल्ल्याला खिंडार; आंबेपुर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवसेनेत

alibaug

  • हजारो कार्यकर्ते महेंद्र दळवी यांच्या संपर्कात

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – अखेर घडायचे तेच घडू लागले. पेझारी, या शेकापच्या बाले किल्ल्यात हजारो शेकापचे कार्यकर्ते वर्षानुवर्षे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडू लागले आहेत. याची सुरुवात एकेकाळी शेकापचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आंबेपुर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शैलेश पाटील यांनी शिवसेनेमध्ये जाहिर प्रवेश करण्यापासून झाली आहे. अद्यापही शेकापचे हजारो कार्यकर्ते आमदार महेंद्र दळवी, अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये येण्यास रांगेत उभे आहेत.

शेकापच्या पेझारी विभागाला हा मोठा धक्का समजला जात आहे. बांधण येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. वर्षानुवर्षे आंबेपुर ग्रामपंचायतीमध्ये शेकापची सत्ता आहे. शेकापला वाढविण्यासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या कट्टर कार्यकर्त्यांना तिकीट देताना कर्जबाजारी केले जाते. त्यांच्या जीवावर निवडून आल्यावर सातत्याने अशा कार्यकर्त्यांना अपमानीत केले जाते. शेकापच्या नेत्यांच्या या विकृतीला कंठाळून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना आश्वासन देताना यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले की, शिवेसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाने वागणुक दिली जाईल व शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचा शब्द दिला. शेकापच्या नेत्यांच्या दादागिरीला वैतागून बाहेर पडणारे कट्टर कार्यकर्ते शेकापचे नेते कशा प्रकारे त्रास देतात हे आता उघडपणे बोलू लागले आहेत.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अशा कट्टर कार्यकर्त्यांना कर्जबाजारी करुन हे नेते आपली झोली भरुन घेत आहेत. कार्यकर्त्यांनी मेहनत करायची आणि फळ शेकापच्या नेत्यांनी घरात बसुन चाखायचे, अशी परिस्थिती सद्या पेझारीच्या शेकापची आहे. यावेळी पुढे बोलताना महेंद्र दळवी यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या राजकारणाला शिवसेनेने कधीच थारा दिलेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाचा संकल्प सोडला आहे. या संकल्पानुसार अलिबाग तालुक्याचा आमदार म्हणून पक्षीय संघटनेतून गाव तेथे शिवसेनेची शाखा आणि घर तेथे शिवसैनिक निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिवसेनेचा शिलेदार म्हणून पक्ष वाढीबरोबरच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचेही आ. महेंद्र दळवी यांनी सांगितले. बांधण येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख राजा केणी, संतोष निगडे, शिवसेना विभाग प्रमुख योगेश जुईकर, अलिबाग तालुका संघटक सतिश पाटील, पोयनाड विभाग संघटक महेंद्र पाटील, शिवसेना सामाजिक कार्यकर्ते नंदुशेट पाटील, पोयनाड उपविभाग प्रमुख महेश वाघ, पोयनाड विभाग उपविभाग प्रमुख विकास निळकर, उद्योजक रत्नाकर पाटील, तसेच शिवसेना युवा प्रमुख संकेत पाटील व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here