नाशिककरांनो सावधान! जिल्ह्यात पुन्हा रुग्णवाढ.

नाशिक ( विशेष प्रतिनिधी कुबेर जाधव ) –  नाशिक जिल्हा दुसऱ्या टप्प्यात आल्यास निर्बंधाचा फास सैल होईल, अशी आशा व्यक्त होत असतानाच जिल्ह्यातील वाढत्या रुग्णवाढीने नाशिककरांवर चिंतेचे मळभ दाटले आहे. जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ५९२ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले, तर पोर्टलवर अपलोड न केलेल्या मृत्यूच्या नोंदींचे सत्र सुरूच असून, रविवारी एकूण ५१० बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये शहरातील १२२, तर ग्रामीणमधील ३८४ जणांचा समावेश आहे. मालेगावातही चार मृत्यू नोंदविले गेले असून एकूण मृतांची संख्या ६,४३० पर्यंत पोहोचली आहे. एकाएकी नोंद होऊ लागलेल्या या मृत्यूच्या नोंदींनी नाशिककर चक्रावले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येने तिसऱ्या टप्प्यातील नाशिककरांवर निर्बंधाची टांगती तलवार आहे.

जिल्ह्यात करोना संसर्गाला अटकाव करण्यात बऱ्यापैकी यश येत असल्याचे चित्र गेले काही दिवस होते. मात्र, हे चित्र पुन्हा बदलू लागले आहे. रविवारी दिवसभरात ५९२ रुग्णांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी ४३३ जण ग्रामीण भागातील आहेत. शहरात १२२, तर मालेगाव शहरात २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय जिल्हाबाह्य आठ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३ लाख ९१ हजार ३४१ पर्यंत पोहोचली आहे. दिवसभरात केवळ १०८ रुग्णांनी करोनावर मात केली असून त्यामुळे एकूण करोना मुक्त रुग्णांची संख्या ३ लाख ८६ हजार ८११ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४ हजार ३०० झाली असून ३५४ संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here