- खा.संजय राऊत यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांची मागणी
- लवकरच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दालनात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन
धुळे (प्रतिनिधी) : शिंदखेडा तालुक्यात औद्योगिक क्षेत्र असलेल्या नरडाणा एम.आय.डी.सी. ग्रोथ सेंटर टप्पा क्रमांक 3 मध्ये सन 2010 पासून शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत झाल्या असुन शेतकऱ्यांचा 7/12 उताऱ्यावर इतर हक्कात महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहतीची नोंद झालेली आहे. शेतकऱ्यांना आजपर्यंत मोबदला मिळालेला नसून इतर हक्कात नाव असल्याने जमिनीही विकता येत नाही, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. यासाठी नरडाणा ग्रोथ सेंटर टप्पा क्र. 3 मधील जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अथवा औद्योगिक महामंडळाचा शिक्का काढावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी खा.संजय राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. खा.राऊत हे शिवसेना पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी धुळे दौऱ्यावर आले होते.
यावेळी जिल्हाप्रमुख श्री.साळुंके यांनी खा.राऊत यांना परिस्थिती समजावुन सांगतांना सांगितले की, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात नरडाणा ग्रोथ सेंटर या नावाने औद्योगिक वसाहत निर्माण झालेली आहे. त्यापैकी टप्पा क्र. 1 व टप्पा क्र. 2 अंतर्गत जमिनीचे वाटप झालेले असुन तुरळक प्रमाणात उद्योग देखील सुरु आहेत. टप्पा क्र. 1 व टप्पा क्र. 2 मध्ये 355 हेक्टर जमिन संपादित झाली असून त्यापैकी 35 टक्के जमिनीवर प्रत्यक्षात उद्योग सुरु आहेत. 65 टक्के भुखंड अजुनही बखळ आहेत. असे असतांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने टप्पा-3 मध्ये नरडाणा औद्योगिक क्षेत्राला लागून नरडाणा, माळीच, गोराणे व वाघोदे परिसरातील काळी, कसदार, सुपिक व बागायती 653 हेक्टर जमीन संपादित करण्याबाबत सन 2010-11 मध्ये अधिसूचना काढली. शेतकऱ्यांच्या जमिनींवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे शिक्के मारण्यात आले व ते आजपर्यंत कायम आहेत. गेल्या दहा वर्षापासून शेतकऱ्यांना औद्योगिक विकास महामंडळाकडून जमिनीचा मोबदलाही मिळत नाही व सातबाऱ्यावरील शिक्केही काढले जात नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना जमिनी विकता ही येत नाही व बँका कर्ज ही देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेले आहे, असे श्री.साळुंके यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना खा.राऊत म्हणाले की, यासंदर्भात लवकरच मा.मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन या विषयावर तोडगा काढला जाईल. शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. नरडाणा औद्योगिक वसाहतीचा टप्पा क्र. 3 च्या जमिनी बाबतीत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांनी आवाज उठविला असुन सद्य परिस्थितीत शिवसेनेच पक्षप्रमुख हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असल्याने सदरील विषयाला चालना मिळेल व महाविकास आघाडीमध्ये वजनदार व्यक्तीमत्व असलेले श्री.संजय राऊत यांनी सदर प्रश्नी आश्वासन दिल्याने हा प्रश्न मार्गी लागेल असे चित्र निर्माण झाले आहे.






