मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – महालक्ष्मी येथील धोबीघाट भागातील शौचालयाच्या मालकी हक्कावरून शिवसेना, मनसे आणि भाजप या तीन पक्षांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. मनसे आणि भाजप एकत्र असून त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर तसेच शिवसेनेवर गौरव्यवहाराचे आरोप केले आहेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी आज या शौचालयाची पाहणी केली.
या शौचालयाचं उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार अरविंद सावंत यांनी 12 जून रोजी केलं आहे आणि शौचालय चालवायची जबाबदारी धोबी कल्याण वेल्फेयर सोसायटीला देण्यात आली आहे. स्थानिक धोब्यांची मागणी आहे की सदर शौचालय हे आधीपासून धोबीघाट कल्याण औद्योगिक विकास कोऑपरेटिव्ह सोसायटी कडे होते. यातून मिळणारं उत्पन्न स्थानिक धोबी समाजाच्या कल्याणासाठी वापरले जात होते. त्यासाठी याची जबाबदारी आधीच्या सोसायटीकडेच देण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांची आहे. तसेच सदर शौचालय मोडकळीस आले होते तेव्हा महापालिकेकडे दुरुस्तीची विनंती करण्यात आली होती. शौचालय दुरुस्त करण्यात आले, मात्र त्याचे हक्क नव्या संस्थेला देण्यात आले आहेत.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीदेखील या शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि लोकांची मागणी समजून घेतली. संदीप देशपांडे यांनी या प्रकरणात महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेवर सडकून टीका केली, शिवाय गैरव्यवहाराचे आरोपही केले आहेत. संदीप देशपांडे म्हणाले की, नालेसफाई टेंडर, रोड घोटाळ्यात तर पैसे खातातच पण आता त्यांच्यावर शौचालयामध्येदेखील पैसे खाण्याची वेळ आली आहे. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. लोकांच्या समस्या काय आहेत आणि त्यांना सुविधा कशा देता येतील, त्यापेक्षा आम्हाला कसे पैसे खाता येतील यावर शिवसेनेचे लक्ष आहे आणि हे शौचालय त्याचं उत्तम उदाहरण आहे.
देशपांडे म्हणाले की, स्वतःच्या अधिकाराचा केलेला हा गैरवापर आहे. आपल्याच मुलाला टेंडर आणि आपल्याच गट अध्यक्षाला शौचालय अशी ही त्यांची पद्धत आहे. प्रत्येक वेळी महापौर म्हणतात की हे राजकारण आहे, ते राजकारण आहे. पण स्वतःच्या गट अध्यक्षाला शौचालय देणे हे राजकारण नाही का? स्वतःची थोबाडं या शौचालयावर लावली आहेत ते राजकरण नाही का? लोकांनी विरोध केला तर ते राजकारण आणि यांनी पैसे खाल्ले तर काय समाजकारण? आम्ही इथल्या लोकांसोबत आहोत आणि शेवटपर्यंत या लढ्यात सोबत राहू.






