रामायणातील आर्य सुमंताची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – लोकप्रिय अभिनेते चंद्रशेखर यांचे वयाच्या 98 व्या वर्षी मुंबईतील अंधेरी येथे राहत्या घरी निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारपणाशी झुंज देत होते. त्यांनी 50 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

काही दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे चंद्रशेखर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयातून घरीही आणण्यात आले होते. आपण अखेरच्या दिवसांमध्ये कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करावा अशी आजोबांची इच्छा होती, असं त्यांचे नातू विशाल शेखर यांनी सांगितले.

हैदराबादमध्ये जन्मलेल्या चंद्रशेखर यांनी 1953 मध्ये व्ही. शांताराम यांच्या ‘सुरंग’ मध्ये पहिल्यांदाच मध्यवर्ती भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी ‘कवी’, ‘मस्ताना’, ‘बरादरी’, ‘काली टोपी लाल रुमाल’, ‘स्ट्रीट सिंगर’ या चित्रपटांतही भूमिका साकारल्या.

चंद्रशेखर यांनी 1998 मध्ये दूरदर्शनवर प्रदर्शित रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत आर्य सुमंत हे पात्र साकारले होते. त्यांनी साकारलेल्या या भूमिकेला कमालीची लोकप्रियता मिळाली होती. या व्यतिरिक्त त्यांनी 60 आणि 70 च्या दशकात ‘कटी पतंग’, ‘हम तुम और वो’, ‘अजनबी’, ‘महबूबा’, ‘अलग-अलग’, ‘शक्ती’, ‘शराबी’, ‘डिस्को डांसर’, ‘नमक हलाल’, ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here