मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – कुंभार्ली घाटामध्ये पोफळी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्र राज्य मुंबईच्या भरारी पथकाने धाड टाकून एका ट्रकमधून होणारी 95 लाख रुपयांची दारू पकडली आहे. या ट्रकबरोबरच ट्रकसोबत असणारी ह्युंडाई आय 10 ही कार उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे. कारवाईत 1 कोटी 23 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्र राज्य मुंबईच्या भरारी पथकाला चिपळूण- कराड महामार्गावरील कुंभार्ली घाटातून दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार घाटामध्ये ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 180 मि.लि. क्षमतेच्या 48 सीलबंद बाटल्यांनी भरलेल्या 1350 बॉक्समध्ये अवैध विदेशी मद्यसाठा सापडला. ट्रकसोबत जाणारी ह्युंडाई आय 10 गाडी आणि ह्युंडाई व्रेटा कार अशा दोन चारचाकी गाडय़ा जप्त करण्यात आल्या.
या कारवाईत एकूण 95 लाखांची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, संजय राठोड, दुय्यम निरीक्षक सुरेश पाटील, दुय्यम निरीक्षक शंकर जाधव, विशाल सकपाळ, जवान अतुल वासावे, राजेंद्र भालेकर, एस.एन.वड, धनाजी दळवी, बाळकृष्ण दळवी, रवींद्र पाटील, सोमनाथ पाटील, अमोल चिलगर, सुधीर देसाई यांनी केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त कांतीलाल उमप यांच्या आदेशानुसार आणि प्रभारी संचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.






